Sunday, September 13, 2009

फुलांचा औषधी उपयोग


सर्व प्राचीन संस्कृतीने सुगंधाचा, फुलांचा आरोग्याशी संबंध जोडला आहे असे दिसते. भारतीय संस्कृतीत देवदेवतांना सुगंधी पुष्प, धूप अर्पण करण्याची पद्धत पुरातन काळापासून आहेच; पण इजिप्त, चीन, जपान येथेही सुगंध, धूप या संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसते. आयुर्वेदात "पुष्पवर्ग' म्हणजे औषधी फुलांची विशेष माहिती देणारा असा वेगळा वर्ग सांगितला आहे, तर आधुनिक काळात "अरोमा थेरपी' या नावाने जगासमोर ही उपचार पद्धती आलेली आहे.

औषध म्हणून एखाद्या वनस्पतीचे पंचांग वापरावे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यात फुलांचाही समावेश असतो. मूळ, खोड वा खोडाचे साल, पाने, फळ व फूल अशी पंच-अंगे असतात. साधारणतः फूल म्हटले की सुगंध आठवतो. सुगंध हा शरीर-मनाला ताजेपणा, स्फूर्ती देणारा गुण असल्याने औषधांमध्ये फुलांचे योगदान मोठे असते. सुगंधामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत मिळते, प्रसन्नता प्रतीत होते. बहुतेक सर्व सुगंधयुक्‍त फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतात, पण फारसा सुगंध नसलेलीही अनेक फुले औषधात वापरली जातात. "भावप्रकाशा'त "पुष्पवर्ग' म्हणजे औषधी फुलांची विशेष माहिती देणारा असा वेगळा वर्ग सांगितला आहे.

मोगऱ्याची फुले सुगंधी असतात. मोगऱ्याचे गजरे आजही वापरले जातात. बऱ्याच घरांत मोगऱ्याचे एखादे झाड असतेच.

मुद्‌गरो मधुरः शीतः सुगन्धिश्‍च सुखप्रदः।

कामवृद्धिकरश्‍चैव पित्तनाशकरो मतः ।।

...निघण्टू रत्नाकर

मोगऱ्याचे फूल मधुर, शीतवीर्याचे, सुगंधी व सुखप्रद असते. कामवर्धक व पित्तनाशक असते.

उष्णता वाढल्याने नाकात फोड येतो, त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा नुसता वास घेतल्याने बरे वाटते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यात मोगऱ्याची फुले टाकली असता ते सुगंधी बनते व असे सुगंधी पाणी पिण्याने उष्णता कमी होण्यास मदत मिळते. मोगऱ्याचा थेंबभर अर्क बत्ताशासह सेवन केल्यास वाढलेले पित्त कमी होते व बरे वाटते.

गुलाब

गुलाबाची फुले प्रसिद्ध आहेत, पण औषध म्हणून वापरायचा देशी गुलाब गुलाबी रंगाचा, सुगंधी व कोवळ्या पाकळ्या असणारा असतो. सुगंध नसणारी गुलाबाची फुले फक्‍त शोभेची असतात.

शतपत्री हिमा हृद्या ग्राहिणी शुक्रला लघुः। दोषत्रयास्रजित्‌ वर्ण्या कट्‌वी तिक्‍ता च पाचनी ।।

...भावप्रकाश

गुलाब वीर्याने शीत असतो, हृदयासाठी हितकर असतो, शुक्रवर्धक व वर्णकारक असतो. चवीला कडू, तिखट असला तरी तिन्ही दोषांना संतुलित करणारा असतो आणि पाचकही असतो.

गुलकंद हे गुलाबाच्या फुलांपासून तयार होणारे प्रसिद्ध औषध होय. गुलकंदामुळे पित्त कमी होते, कांती उजळते, ताप, गोवर, कांजिण्या वगैरे रोगांनंतर शरीरात राहणारी कडकी दूर होते. गुलाब शौचाला साफ होण्यास मदत करतो. डोळ्यांची आग होत असता किंवा डोळे थकले असता पापण्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो.

कमळ

गणपतीला व देवीला वाहण्यासाठी कमळ वापरण्यात येते. कमळ हे एक मोठे औषध आहे.

कमलं शीतलं वर्ण्यं मधुरं कफपित्तजित्‌ ।

...भावप्रकाश

कमळ थंड, वर्ण सुधारणारे, चवीला मधुर व कफ-पित्तदोष कमी करणारे असते. लाल, पांढरे व निळ्या रंगाचे कमळ असते. कमळाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे ते हृदयाची शक्‍ती वाढवते. हृदयाची धडधड होत असता, हृदय अशक्‍त झाले असता कमळाच्या फुलाचे चूर्ण, मध, लोणी व खडीसाखर यांचे मिश्रण दिले जाते. पद्मघृतासारखा कमळापासून बनविलेला योगही हृद्‍रोगावर अतिशय उपयुक्‍त असतो. कमळाच्या फुलाचे चूर्ण मध, लोणी व खडीसाखरेसह घेण्याने स्त्रियांचे अंगावरून जाणे थांबते.

जाई

पांढऱ्या फुलांची जुई-जाईची वेल घराबाजूच्या बागेत असते.

पुष्पं सुगन्धि संप्रोक्‍तं मनोज्ञं कफपित्तनुत्‌ ।

...निघण्टू रत्नाकर

जाईचे फूल अतिशय सुगंधी, दिसायला मनोहर व कफ-पित्तशामक असते. जाईच्या कळ्या नेत्ररोग, त्वचारोग, जखमा, फोड येणे वगैरे तक्रारींवर उपयुक्‍त असतात.

जुई

सुगन्धी वातकफकृत्‌ पित्तदाहतृषापहा।

त्राश्‍मरी च त्वग्दोषं रक्‍तदोषं व्रणं तथा ।।

...निघण्टू रत्नाकर

जुईचे फूल सुगंधी असून, पित्तदोष कमी करते, दाह शमवते, तृष्णा भागवते. मुतखडा, त्वचाविकार, रक्‍तदोष, जखमा, दंतरोग, नेत्ररोग, मुखरोग, शिरोरोग वगैरेंमध्ये हितकर असते. विषाचा नाश करते, तसेच तापामध्ये हितकर असते.

सोनचाफा

चम्पक कटुकस्तिक्‍तः कषायो मधुरो हिमः ।

विषक्रिमिहरः कृच्छ्रकफवातास्रपित्तजित्‌ ।।

...भावप्रकाश

सोनचाफा चवीला गोड, तिखट, कडू व तुरट असतो. वीर्याने शीत असतो. विषदोषाचे शमन करतो, रक्‍तदोष दूर करतो. सोनचाफ्याच्या सुगंधामुळे हवा शुद्ध होते.

बकुळ

बकुळीचा मोठा वृक्ष असतो व सकाळी झाडाखाली छोट्या सुगंधी फुलांचा सडा पडलेला असतो.

तत्पुष्पं रुचिरं शीतं मध्वाढ्यं मधुरं मतम्‌ ।

सुगन्धि स्निग्धकषायम्‌ ।।

.....भावप्रकाश

बकुळीची फुले वीर्याने थंड व गोड सुगंधाची असतात, रुची वाढवतात, चवीला मधुर व तुरट असून, गुणाने स्निग्ध असतात. लहान बालकाला खोकला झाला असता बकुळीची फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी गाळून घेऊन ते पाणी प्यावयास देतात. बकुळीची ताजी फुले खडीसाखरेसह खाल्ल्यास व वरून थंड पाणी प्यायल्यास हलणारे दात मजबूत होतात, असे सांगितले जाते.

मेंदीची फुले

मेंदीची फुले थंड असतात व त्यांना विशेष असा मादक सुगंध असतो. डोके दुखण्यावर मेंदीच्या फुलांचा चांगला उपयोग होताना दिसतो. मेंदीची फुले ठेचून तयार केलेला काढा दूध व साखरेसह घेतल्यास डोकेदुखी कमी होते. मेंदीची पाने वाटून केसाला, तळहातांना व तळपायांना लावल्याने रंग छान दिसतो व शरीरातील उष्णता कमी होते.

आंब्याचा मोहर

आंब्याचा मोहर सुगंधी असतो. वसंतात आंब्याचा मोहर आला की वातावरण सुगंधी होते. स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आंब्याचा मोहर तुपात तळून खायला दिला जातो.

डाळिंबाचे फूल

डाळिंब हे फळ म्हणून सर्वांना माहिती असते, पण डाळिंबाच्या फुलाची कळी- म्हणजेच अनारकली अतिशय सुंदर दिसते. डाळिंबाच्या फुलाचा रस नाकात टाकला असता उष्णतेमुळे नाकातून पडणारे रक्‍त बंद होते.

धायटी

धायटीची फुले लाल रंगाची असतात. गर्भाशयाच्या रोगांवरचे हे एक मोठे औषध समजले जाते. धायटीच्या फुलांचा काढा घेतल्यास योनीवाटे अतिरक्‍तस्राव होणे थांबते. गर्भधारणा होण्यासाठीही धायटीची फुले सहायक असतात. धायटीची फुले आसव-अरिष्टे बनविण्यासाठी वापरली जातात, यामुळे संधानप्रक्रिया व्यवस्थित होते.

जास्वंद - जपाकुसुम

जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावला असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.

पळस

"पळसाला पाने तीन' अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पळसाच्या वृक्षाला लाल रंगाची फुले येतात. पळसाची फुले लघवी साफ होण्यासाठी उत्तम असतात. लघवी अडली असल्यास किंवा थांबून थांबून होत असल्यास पळसाची फुले वाफवून ओटीपोटावर बांधली जातात. पळसाच्या फुलांचे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घेण्यानेही लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

मोह

मोह नावाचे मोठे वृक्ष असतात. मोहाची फुले अतिशय सुंदर व मंद सुगंध असणारी असतात. मोहाच्या फुलांचाही आसव-अरिष्टे बनविण्यासाठी वापर केला जातो. मोहाची फुले थंड व पौष्टिक असतात. मोहाची फुले व खडीसाखरेपासून गुलकंदाप्रमाणे मोहकंद तयार केला जातो. या मोहकंदामुळे कडकी नष्ट होते व शक्‍ती वाढते.

शेवगा

शेवग्याच्या शेंगेप्रमाणे शेवग्याच्या फुलांची रुचकर भाजी केली जाते. शेवग्याची फुले चवीला तिखट, वीर्याने उष्ण व डोळ्यांना हितकर असतात. वातरोग, सूज, जंत, प्लीहावृद्धी वगैरे विकारांवर शेवग्याची फुले उत्तम असतात.

या प्रकारे पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालण्यात अग्रणी असणारी फुले आरोग्यासाठीही महत्त्वाची असतात.

इतिहासाकडे पाहिल्यास सर्व प्राचीन संस्कृतींत सुगंधाचा, फुलांचा आरोग्याशी संबंध जोडल्याचे लक्षात येते. भारतीय संस्कृतीत देवदेवतांना सुगंधी पुष्प, धूप अर्पण करण्याची पद्धत पुरातन काळापासून आहेच, पण इजिप्तच्या इतिहासातही सुगंध, धूप या संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसते. चीन, जपान वगैरे देशांतही देवदेवतांची स्तुती करण्यासाठी सुगंधाचा वापर केला जात असे.

आयुर्वेदात सुगंधाचा, सुगंधी फुलांचा आरोग्याशी संबंध असतो, हे दाखविणारे असंख्य उल्लेख आहे. आधुनिक काळात "अरोमा थेरपी' नावाने जगासमोर आलेली उपचार पद्धती आयुर्वेदातील सुगंध-उपचाराचाच एक भाग आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये.
डॉ. श्री बालाजी तांबे

2 comments:

  1. फुलांचे औषधी गुणधर्म व उपयोग माहीत पाहिजे होती.
    नाव महेश काळे, ता.संगमनेर,जि.अहमदनगर

    ReplyDelete
  2. जोशी म्हणून एक गृहस्थ आहेत mak drup नारायण पेठ च्या बोळा मध्ये दर शनिवारी 4-6 असतात त्यांना भेटा

    ReplyDelete