Monday, August 3, 2009

शरीराची निगा

चेहरा व मस्तक यांना मालिश केल्याने त्वचेचे व केसांचे आरोग्य वाढते. पुरेशी झोप घेणे, नियमित दिनचर्या, जागरणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी, आंबा, लिंबू, आवळे, टोमॅटो, गाजर, कडधान्ये इत्यादी 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश हवा.

त्वचा हे संपूर्ण शरीराचे आवरण आहे. शरीराचा हा अवयव सर्वाधिक दर्शनीय असल्यामुळे सर्वप्रथम नजरेत भरतो. त्वचा हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. इतर ज्ञानेंद्रिये नसली तरी माणूस जगू शकतो; पण त्वचेशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणूनच अपघाताने भाजल्यावर किती टक्के त्वचा जळाली याचा उल्लेख केला जातो. त्वचेमुळे शरीरातील जलसंतुलन होते. शरीराचे तापमान टिकून राहते. बाहेरील जिवाणू-विषाणूंपासून शरीराचे संरक्षण होते. सर्व ऋतूंमध्ये तसेच वयोमानपरत्वे त्वचेची निगा राखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.

त्वचा ही आतून सजीव आणि बाहेरून निर्जीव असते. निर्जीव बाह्य आवरणामुळेच कुठलेही जंतू त्यावर तग धरू शकत नाहीत. याला अपवाद मात्र काही फंगसचा (बुरशीचा) असतो. त्वचेवर असंख्य रंध्रे असतात. त्वचेमध्ये तेलग्रंथी ऊर्फ सिबॅशियम ग्लॅंड्‌स असतात. त्या त्वचेवर तेलाचे आवरण निर्माण करतात. याशिवाय त्वचेवर पुरुषांमध्ये नऊ आणि स्त्रियांमध्ये दहा द्वारे असतात. त्वचेमधील सर्व रंध्रे तसेच द्वारांमधून आतील पदार्थ बाहेर येऊ शकतात आणि बाहेरील पदार्थ व घाण आत जाऊ शकते. त्वचेच्या निगेमध्ये मुख्यतः या रंध्रद्वारांच्या स्वच्छतेचा विचार व्हायला हवा.

त्वचा, डोळे, कान, नाक इत्यादी ज्ञानेंद्रिये तसेच तोंड, मूत्रमार्ग, मलमार्ग याची स्वच्छता नियमितपणे करायला हवी. अस्वच्छता हे वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण ठरते. स्वच्छतेविषयी सजगता बाळगताना शरीर हे सतत दुर्गंधीयुक्त पदार्थ बाहेर टाकत असते, हे लक्षात येते. त्यामुळे काही वेळा काही जण "अतिस्वच्छते'च्या आहारी जाऊन झपाटल्याप्रमाणे दिवसातून अनेकदा शरीर स्वच्छ ठेवण्याच्या मागे असतात. शरीर जराही मळलेले त्यांना सहन होत नाही. अस्वच्छता जशी वाईट; तशीच स्वच्छतेची सततची चिंताही वाईट. अस्वच्छतेने शारीरिक आजारपणे येतात, तर अति स्वच्छ राहण्याच्या स्वभावाने मानसिक संतुलन बिघडते. त्यासाठी शरीर हे सतत अस्वच्छ होणारे यंत्र आहे हे लक्षात ठेवून योग्य वेळी योग्य ती स्वच्छता करणे आवश्‍यक आहे.

जीवनाचा आरोग्यखेळ

खेळामुळे नुसतेच आरोग्य मिळते असे नव्हे, तर खेळकरपणा व आनंदीपणा वाढतो, एक-दुसऱ्याला सहन करण्याची शक्‍ती मिळते, पराजय पत्करण्याची शक्‍ती मिळते; पण सध्या खेळसुद्धा छोटे छोटे करत आणले आहेत.

पूर्वी माणसे शे-पाचशे वर्षे जगत असत. अलीकडे शंभर-सव्वाशे वर्षे जगलेली माणसे आढळतात; पण एकंदरीतच मध्यंतरीच्या काळात मनुष्याची आयुर्मर्यादा खूप कमी झालेली होती. आता आधुनिक काळात पुन्हा आयुर्मर्यादा वाढलेली आहे. पण सध्या मनुष्याचे नुसते अस्तित्व अधिक काळ टिकून राहिलेले दिसते. आयुर्मर्यादा वाढली आहे असे म्हणताना मनुष्य मात्र वार्धक्‍याने पीडित झालेला, स्मृतिरहित, काही काम करता येत नाही असा व परस्वाधीन असलेला दिसला तर काय उपयोग? एकूणच काय, तर सध्या मनुष्याचा आकार व आयुष्यमान दोन्ही कमी झाल्यासारखे दिसते. का कोण जाणे, पण माणसाच्या मनात विचार आला, की सर्व गोष्टी छोट्या छोट्या कराव्यात. त्यामुळे छोटे रेडिओ, मिनी टेलिफोन, मिनी कॅमेरा असे सगळी छोटे छोटे तयार झाले. इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु इस्टंट व्यायाम, पटकन वजन उतरवणे, पटकन सिक्‍स पॅक स्नायू तयार करणे, झटकन खाणे, अशा तऱ्हेचे शॉर्ट कट्‌स मारून तयार झालेली प्रकृती आरोग्यदायी किंवा जीवनाला योग्य दिशा देणारी असेल असे वाटत नाही.

जीवनातील महत्त्वाचा विभाग म्हणजे खेळ. जीवन हा शंकर-पार्वतीने मांडलेला सारिपाटाचा खेळ आहे असे म्हणतात. तो जर यशस्वी करायचा असेल, तर माणसाने हसत-खेळत जीवन जगावे व खेळांना महत्त्व द्यावे. आपण म्हणतो, "जरा या लहान मुलाला खेळवणार का?' तेथपासून आपल्या आयुष्यात खेळ सुरू होतात. लहान मूल आपल्याबरोबर खेळते, मोठे होत असताना ते अनेक प्रकारचे खेळ करते, या खेळामुळे नुसतेच आरोग्य मिळते असे नव्हे, तर खेळकरपणा व आनंदीपणा वाढतो, एक-दुसऱ्याला सहन करण्याची शक्‍ती मिळते, पराजय पत्करण्याची शक्‍ती मिळते. पण सध्या खेळसुद्धा छोटे छोटे करत आणले आहेत. पूर्वी पाच दिवस चालणारी क्रिकेटची मॅच सध्या एक दिवसावर आलेली आहे. आता तर केवळ २०-२० म्हणजे फक्‍त प्रत्येक संघाने केवळ २० ओव्हर टाकून मॅच खेळली जाते व तेवढ्यातच प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आनंद घेणे अपेक्षित असते. यात खेळ किती दिसेल हे माहीत नाही; पण या २०-२० मुळे पैशाचे गणित मात्र खूप मोठ्या आकड्यापर्यंत पोचलेले दिसते. या सर्व टीम्सना विकत घेणारी माणसे खूप पैसे देतात व पैसे कमावतात.

माणसाच्या लहान झालेल्या जीवनाला कुणी तरी विकत घेऊन माणसांना रात्रंदिवस कामाला लावून काही मोजकी माणसे पैसे कमावतात. त्यामुळे गरीब-श्रीमंतांतील दरी वाढत जाते व असे करत करत जीवनाचा खेळ २०-२० ओव्हर्सवर येऊन बसलेला आहे. म्हणजे वयाची चाळिशी गाठेपर्यंतच मनुष्याला रक्‍तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्मृतिविभ्रंश असे नाना तऱ्हेचे रोग त्रास देऊ लागतात. ज्या वेळी जो संघ खेळेल त्याने कुठल्या चुका करू नयेत व कुठल्या चुका कराव्यात, जेणेकरून निदान हा २०-२० ओव्हरचा जीवनाचा खेळ आनंदमय होऊन त्यात जिंकता येईल व पुन्हा पुढच्या चाळीस वर्षांसाठी मनुष्याचे आरोग्य नीट तयार होईल, अशा कल्पना डोक्‍यात धरून साधारणतः अगदी कमीत कमी शब्दांत, कमीत कमी नियमांत सांगायचे म्हटले तरी २० नियम डोळ्यांसमोर दिसत होते. त्यातून २०-२० ओव्हर्सची, २०-२० पाळ्यांची कल्पना आली. कुठले २० नियम खेळातून आउट करतात, कुठले २० नियम पाळले असता जीवन यशस्वी होते व जीवनाची मॅच जिंकता येते, याची एक यादी तयार केली.

पावसात भिजू नये, थंडी-वाऱ्यात बाहेर फिरू नये, उंचावरून उडी मारू नये हे साधारणतः प्रत्येकाला माहितीच असते. व्यसने वगैरेंची साथ धरल्यास आपल्याला जीवनयात्रा अर्ध्यावर संपवावी लागेल याची कल्पना साधारण प्रत्येकाला असते. या गोष्टी टाळल्या तरी सकाळी रोज उशिरा उठणे, प्रकृतीला न मानवणारे अन्न-पाणी सेवन करणे, अतिमैथुन, नेहमी अति उत्तेजित अवस्थेत राहणे, सतत शृंगार वा मैथुनाचा विचार करणे, न पचणारे जडान्न खाणे, व्यसन करणे ही प्रतिष्ठा आहे असे समजून एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चूक झाल्यास खेळाडू नक्कीच आउट होतो.

निरामय दीर्घायुष्य जगणाऱ्या मंडळींनी काही सोपे सोपे नियम आत्मसात केलेले असतात. लवकर झोपून लवकर उठण्याचा नियम पाळताना ते जीवनामधील कुठल्याच आनंदाला वंचित होत नाहीत. खूप थकवा आला असल्यास सुखशय्येवरसुद्धा झोप नीट लागत नाही. तेव्हा प्रत्येकालाच लवकर निजे, लवकर उठे.... याचे पालन करण्यास काय अडचण असावी?

स्वतःच्या प्रकृतीला मानवेल असे अन्न खाण्यात किंवा सामिष अन्न टाळण्यात काय अडचण असावी? मांसाहार करून आलेल्या ताकदीचा वापर तरी कोठे करणार? खेळाडू, घोडेस्वार, पोलिस, ताकद आवश्‍यक असणारा व्यवसाय करणारी मंडळी सामिष आहार करतील तर ते समजण्यासारखे आहे; पण सरसकट सर्वांनीच मांसाहार करून का म्हणून आयुष्य खराब करून घ्यावे? मेंदूचे विकार वा कर्करोगासारखे आजार असणाऱ्यांनी तर मांसाहार केला असता आपली जीवनयात्रा लहान करण्याचे ठरविलेले दिसते..

सोप्या सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास जीवनाची २०-२० ओव्हर्सची मॅच अत्यंत यशस्वीरीत्या पार करून पुन्हा २०-२० ओव्हर्स खेळायची संधी मिळू शकते. मल-मूत्रविसर्जन नीट होणे खूप आवश्‍यक असते व त्याकडे लक्ष देण्यासाठी आधुनिकता वा जुनाट विचार यांचा परिणाम होण्यासारखा नसतो. भरपूर पाणी पिण्याने आरोग्य नीट राहत असले तर भरपूर पाणी पिण्याला प्रत्यवाय कुठला असावा? पाण्याऐवजी रासायनिक द्रव्ये असलेली बाटलीतील एरिएटेड पेये का प्यायची?

तेव्हा २०-२० ची पारी व्यवस्थित पूर्ण करायची असली तर सोपे सोपे नियम पाळणे आवश्‍यक आहे, असे केल्याने जीवनाचा खेळ आनंदाने जगताही येईल.

आयुर्वेद म्हणजे जुन्या लोकांनी, जुन्या वेळेला कुठलेही प्रयोग न करता सिद्ध केलेली विद्या आहे असे डोक्‍यात धरून आयुर्वेदाने सांगितलेल्या सूचना न पाळता व आपण आधुनिक आहोत असे समजून वागले तर जीवनयात्रा नक्कीच लवकर संपेल. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा पूर्वीच्या वेळी होऊन गेलेल्या मोठ्या खेळाडूंच्या चुका व कसब, त्यांच्या खेळातील प्रावीण्य यांचा विचार आजही केला जातो. असे असताना या खेळाडूंना जुनाट म्हणता येईल का? त्यांनी तयार केलेल्या खेळाच्या पद्धतीचा व त्यामुळे त्यांनी मिळविलेल्या प्रावीण्याचा अभ्यास करून खेळात सुधारणा करता येईल.

रोग आल्यास औषधे घेतानासुद्धा आधी रोगाची पूर्ण कल्पना करून घेणे आवश्‍यक असते. शरीर व रोग हे एकमेकाचे शत्रू आहेत असे समजण्यास हरकत नाही, रोगसंप्राप्ती झाली असता, दोन्ही बाजूंचे संख्याबल, दोन्ही बाजूंच्या सैनिकांजवळ असलेली आयुधे यांचा विचार न करता लढलेले युद्ध कधीच जिंकले जात नाही. शरीराची व रोगाची संपूर्ण माहिती मिळवून, त्यावर काही घरगुती उपचार करता येतात का ते पाहून त्यानंतर रोग न हटल्यास योग्य औषधे घेऊन रोग समूळ नष्ट करायला काय अडचण असावी?

शत्रू आपल्याला दिसू नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली वा शत्रू आपल्याला दिसणार नाही याची खबरदारी घेतली तर युद्धात आपण जिंकले जाऊच असे नव्हे, उलट पट्टी बांधून झोपलेल्या मनुष्यावर शत्रू येऊन केव्हा घाला घालेल व गळा कापेल हे समजणारही नाही. रोगावर मुळातून उपचार न करता केवळ लक्षणे मिटवण्यावर भर देऊन डोळ्यांवर पट्टी बांधून बसणे कितपत योग्य आहे?
डॉ. श्री बालाजी तांबे


जीवनसंगीत

'आरोग्यसंगीता'चा उपयोग केल्याने नुसते वैयक्‍तिकच नव्हे; तर एकूण वातावरणाचे, सर्व सृष्टीचे व निसर्गाचे संतुलन होईल. म्हणजे आरोग्यसंगीमुळे नुसते रोगनिवारण न होता संपूर्ण विश्‍वात आरोग्यसंतुलनाचा अनुभव घेता येईल.

संगीत म्हणजेच जीवन. सर्व विश्‍वाची उत्पत्ती नादापासून झालेली आहे आणि स्वर-ताल यांची एक अप्रतिम रचना म्हणजे हे जीवन! या जीवनात स्वर वा ताल बिघडला तर आनंद मिळत नाहीच पण एकूणच जीवन नकोसे वाटते. संगीताचेही असेच असते. संगीतामध्ये सूर व तालाला खूप महत्त्व असते. संगीत जोपर्यंत स्वरात व तालात सुरू असते तोपर्यंत ते कर्णमधुर असते. जीवनात प्रत्येक व्यक्‍ती कुठल्यातरी सृजनाचा आनंद घेत असते तसेच संगीतात कविता मिसळली जाते तेव्हा ते संगीत पूर्णत्वाला पोचते. मनुष्यमात्रामध्ये वा प्राणिमात्रांमध्ये असंतुलनातून रोगोत्पत्ती होते. असंतुलनामुळे हृदयाचा ठोका चुकतो, वातावरणाचे संतुलन बिघडते वा एकूणच जीवनाची घडी विस्कटते असे म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदानुसार प्रज्ञापराधामुळे रोग होतो असे समजले जाते. स्वर, ताल व कविता यांचे असंतुलन म्हणजे प्रज्ञापराध. मनुष्याच्या बाबतीत विचार केला असता शरीर, मन व आत्मा यांचा एकमेळ होत नाही तेव्हा होतो प्रज्ञापराध व त्यातून उत्पन्न होतो रोग.

संगीत जर जीवनाशी एवढे समरस झालेले असेल, जीवन म्हणजेच संगीत असेल तर असंतुलन दूर करण्यासाठी संगीताचा अवश्‍य उपयोग व्हावा. ज्यावेळी मनुष्यमात्रांचे आरोग्य व्यवस्थित असते, जीवनात चालणाऱ्या कार्यामुळे ध्येयाकडे वाटचाल होत असते व सर्व जीवन ऋतुचक्रानुसार चालू राहते तेव्हा जीवन म्हणजे संगीत आहे याचा प्रत्यय येतो. ही संकल्पना लक्षात आल्यास जीवनातल्या असंतुलनासाठी संगीताने उपचार करता येतात हे आपल्याला पटू शकते.

मन व संगीताचा संबंध भारतीय शास्त्राने शोधला. एका विशिष्ट तऱ्हेने स्वरांची योजना करून मनाची पकड कशी घेता येईल याचा विचार केला व यातून "राग' निर्माण झाले. मनाचा भाव वा मानसिकता बदलण्याचे काम राग करतात. त्यामुळे मनाचे रंग रागामुळे बदलतात. स्वरमालिकेची विशिष्ट पकड म्हणजे राग अशी आपण रागाची परिभाषा करू शकतो. त्यामुळे रागसंगीत वा रागावर आधारित संगीत ऐकल्यावर मनाचा रंग बदलतो यात काही नवल नाही. संगीताचा उपयोग नुसताच मनाचा रंग बदलणे वा मनाला दुःखातून आनंदाकडे नेणे एवढा मर्यादित नाही.

जीवनाचे कार्य नीट चालावे असे वाटत असेल तर संपूर्ण रोगनिवृत्ती व्हावीच लागेल व त्यासाठी रोग बरा करत असताना शरीरातील कुठल्या भागात रोग आहे, शरीराच्या कुठल्या भागाचे काम नीट होत नाही किंवा वात-पित्त-कफाचे असंतुलन कोठे झालेले आहे व ते दूर कसे करता येईल याचा विचार करावा लागतो. संगीत शरीरातील सर्व नाड्यांमधून प्रवाहित करून विशिष्ट अवयवापर्यंत पोचविण्याचे काम कवितेने म्हणजे शब्दांनी केले जाते. शब्द योग्य तऱ्हेने उच्चारण्यासाठी श्‍वासाचे गणित सांभाळणे व विशिष्ट आघात करून कंठातून योग्य नाद उत्पन्न होणे आवश्‍यक असते.

शरीरातील सर्व नाड्या (मेरिडिअन) विशिष्ट अवयवांना जोडलेल्या असतात. या सर्व नाड्या शब्दोच्चारामुळे छेडल्या जातात. उदा. ओठामधून जाणारी चेतनानाडी "प'वर्गाचे सर्व शब्द स्पंदित करते. या "प'वर्गाला पाच प्रकारे श्‍वासाचे चलनवलन जोडल्याने प-फ-ब-भ-म हा "प'वर्ग तयार होतो. ह्याचप्रमाणे सर्व स्वर व व्यंजनांची उत्पत्ती होते. या स्वर व व्यंजनांची विशिष्ट प्रकारे रचना करून त्याला रागसंगीतात बसवले तर शरीर, मन व आत्म्याचे आरोग्य संतुलित करता येते. म्हणजेच संगीत जीवनाला संतुलित करण्यासाठी उपयोगी पडते.

आरोग्य प्राप्त होईल या हेतूने मनुष्यमात्राला शरीराची, शरीराच्या संतुलनाची व असंतुलनाची माहिती करून देणे व एकूणच जीवन संगीतमय करणे असा "फॅमिली डॉक्‍टर' चा उद्देश आहे. आरोग्यशिक्षण सर्वांपर्यंत पोचावे या दृष्टीने "फॅमिली डॉक्‍टर'ने प्रयत्न केले. त्यात उपचारांच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून दिली. आयुर्वेद हा सर्वसमावेशक असल्याने आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य कसे मिळवता येईल यावर भर दिला. प्रत्येकाला आवश्‍यक असणारी औषधे व उपचार कधी मिळू शकतात तर कधी मिळू शकत नाहीत पण संगीताद्वारे केले जाणारे उपचार प्रत्येकाला सहजपणे व स्वस्तात उपलब्ध असतात, त्यासाठी खर्चही अत्यल्प येतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी सकाळी जात्यावर म्हणायच्या ओव्यांपासून ते रात्री झोपेपर्यंत संगीताचा भरपूर वापर केलेला दिसतो. संगीत हे कुणी अभंगात कुणी आर्येत, कुणी स्तोत्रात तर कुणी मंत्रात बसवले. वेदकाळापासून आद्य शंकराचार्यांपर्यंतच्या काळात पाहिल्यास असे लक्षात येते की बहुतेक सर्व संगीतरचना मनुष्यमात्राचे शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्य नीट करण्यासाठी तयार केल्या गेलेल्या होत्या. ह्या काव्यरचना वा मंत्ररचना कशा गाव्या? याचे शास्त्रही तयार केले गेले.

बहुतेकांना कल्पना असते की संगीतामुळे प्राणिमात्रांवर परिणाम होतो. गावात असलेले उंदीर बासरी वाजवून बाहेर नेल्याची कथा आपणा सर्वांना माहीत आहे. संगीतामुळे पाऊस पाडल्याच्या किंवा संगीतामुळे दगडाला पाझर फोडल्याच्या गोष्टीही आपल्याला माहीत असतात.

संगीताचा उपयोग पृथ्वीच्या पाठीवर सर्व मनुष्यमात्राने, लहानथोरांनी, सर्व धर्मांनी व सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवस्थांनी करून घेतलेला दिसतो. प्रार्थना ही जीवनाचा जणू पाया असल्यासारखी सर्व जगभर प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने संगीतप्रार्थनेने दिवसाची सुरुवात करावी, रात्री झोपताना प्रार्थना करावी, प्रार्थनेद्वारे देवाला आळवून देवाला प्रसन्न करून घ्यावे ही कल्पना मानवजातीत रुजलेली दिसते. हा देव दुसरा तिसरा कोणी नसून तो शरीर, मन व आत्म्याचे जेथे संतुलन असेल म्हणजेच जेथे प्रसन्नता असेल तेथे देव अवतरतो. आयुर्वेदानेही "प्रसन्नात्मेन्द्रियमनाः' असे म्हणून आरोग्यदेवतेची उपासना सांगितलेली आहे.

सध्याच्या संगीतात ताल असल्यासारखा वाटतो पण त्यात ताल नसतो, तसेच यात स्वर असतात पण राग नसतो. काळाबरोबर कितीही आधुनिकता आली तरी बेताल, बेसूर व कर्कश नाद जीवनाचे संतुलन करू शकत नाही.

संगीतामुळे रोगनिवारण पुनश्‍च आपल्या जीवनात यावे ह्या गोष्टीचा विचार करून "फॅमिली डॉक्‍टर'च्या ३००व्या अंकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी "आरोग्यसंगीता'च्या मैफिलीचे आयोजन करण्याचे ठरले. जे जे भावसंगीत, भक्‍तिसंगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, भजनसंगीत असे जे संगीत आज उपलब्ध आहे त्यातील काही रचनांचा उपयोग करून श्रोत्यांपर्यंत ही संकल्पना पोचविण्याच्या दृष्टीने "आरोग्यसंगीता'च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले.

"संगीताने जीवनसंतुलन' ही संकल्पना राबवत असताना संगीततज्ज्ञ, गायक व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्रितपणे यावर पुन्हा एकदा चिंतन, प्रयोग, संशोधन करणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारचे आरोग्यसंगीत समाजाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या मंडळींनी घेतल्यास खूप मोठे कार्य होईल. पूर्वीच्या काळी सकाळी घरोघरी गात जाणारा वासुदेव, प्रभातफेऱ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी व ठिकठिकाणी सकाळ-संध्याकाळ एकतारीवर भजने म्हणणारी मंडळी समाजाचे व वातावरणाचे संतुलन करत असत ही माहिती आपल्या सर्वांना आहेच.

"आरोग्यसंगीता'चा उपयोग केल्याने नुसते वैयक्‍तिकच नव्हे तर एकूण वातावरणाचे, सर्व सृष्टीचे व निसर्गाचे संतुलन होईल. म्हणजे आरोग्यसंगीमुळे नुसते रोगनिवारण न होता संपूर्ण विश्‍वात आरोग्यसंतुलनाचा अनुभव घेता येईल.

आजच्या "आरोग्यसंगीता'च्या कार्यक्रमातील संगीताद्वारे जीवन संतुलन करण्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचावे ही अपेक्षा !

डॉ. श्री बालाजी तांबे