Sunday, June 28, 2009

आयुर्वेद: भाज्यांचे आयुर्वेदिक गुण

काही भाज्यांचे आयुर्वेदिक गुण


कोहळा

कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरु पित्तास्रवातनुत्‌ ।

बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।।

वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु ।

बस्तिशुद्धिकरं चेतो रोगहृत्‌ सर्वदोषजित्‌ ।।

...भावप्रकाश

कोहळा पुष्टिकर, शुक्रधातुपोषक, पित्त व वातदोष कमी करणारा असतो आणि तो रक्‍तदोषातही हितावह असतो. अगदी कोवळा कोहळा पित्तशामक व शीत गुणधर्माचा असतो. मध्यम कोहळा कफ वाढवतो. पिकलेला कोहळा फार थंड नसतो, पचायला हलका असतो, स्वादिष्ट असतो, अग्नी प्रदीप्त करतो, मूत्राशयाची शुद्धी करतो, मानसिक रोग दूर करतो व त्रिदोषांना जिंकतो.

काकडी

कर्कटी शीतला रुक्षा ग्राहिणी मधुरा गुरु ।

रुच्या पित्तहरा सामा पक्वा तृष्णाग्निपित्तकृत्‌ ।।

...भावप्रकाश

काकडी वीर्याने थंड, चवीला गोड, थोडी रुक्ष असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रुचकर असते, कच्ची म्हणजेच कोवळी काकडी पित्तशामक असते, मात्र पिकलेली काकडी पित्त वाढवते व तहान उत्पन्न करते.

तोंडली

बिम्बीफलं स्वादु शीतं गुरु पित्तास्रवातजित्‌ ।

स्तम्भनं लेखनं रुच्यं विबन्धाध्मानकारकम्‌ ।।

...भावप्रकाश

तोंडली चवीला स्वादिष्ट, शीत वीर्याची व पचायला जड असते, मात्र पित्तदोष व कफदोष कमी करते, अतिरिक्‍त चरबी कमी करते, रुचकर असते मात्र थोड्या प्रमाणात गॅसेस व मलावष्टंभ करू शकते.

तोंडलीमुळे बुद्धी कमी होते असे निघंटु रत्नाकरात सांगितले आहे. तसेच जीभ जड असणाऱ्या मुलाला तोंडलीची भाजी देऊ नये असा वृद्धवैद्याधार आहे.

कारले

कारवेल्लं हिमं भेदि लघु तिक्‍तामवातलम्‌ ।

ज्वरपित्तकफास्रघ्नं पाण्डुमेहकृमीन्‌ हरेत्‌ ।।

...भावप्रकाश

कारले वीर्याने शीत असते, मलाचे भेदन करते, पचायला हलके व चवीला कडू असते, पित्तदोष व कफदोष कमी करते, रक्‍तदोष कमी करते, योग्य प्रमाणात घेतल्यास पांडूरोग, प्रमेह व कृमीरोगात हितकर असते. मात्र कारल्याचे सेवन अतिप्रमाणात केल्याने वात वाढताना दिसतो. त्यामुळे भाजी म्हणून केलेला कारल्याचा वापर पुरेसा ठरावा.

टिंडा / ढेमसे

डिण्डिशो रुचिकृद्‌ भेदी पित्तश्‍लेष्मापहः स्मृतः ।

शीतलो वातकृत्‌ रुक्षो मूत्रलश्‍चाश्‍मरीहरः ।।

...भावप्रकाश

टिंडा ही एक पथ्यकर भाजी होय. टिंडा चवीला रुचकर असतो, पित्त तसेच कफदोषाचे शमन करतो, वीर्याने शीत असतो, रुक्ष गुणाचा असल्याने वात वाढवतो, मूत्रप्रवर्तनास मदत करतो व मूतखड्यामध्ये हितकर असतो.

कर्टोली

कर्कोटी मलहृत्‌ कुष्ठहृल्लासारुचिनाशनी ।

श्‍वासकासज्वरान्हन्ति कटुपाका च दीपनी ।।

...भावप्रकाश

कर्टोलीची भाजी मलदोष दूर करते, त्वचारोगात हितकर असते, मळमळ, अरुची, दमा, खोकला, ताप वगैरे त्रासात अतिशय हितकर असते, अग्नी प्रदीप्त करते.

भेंडी

भेंडी त्वम्लरसा चोष्णा ग्राही च रुचिकारका ।

राजनामनिघण्टे च द्रव्ये वृष्या परा स्मृता ।।

...निघण्टु रत्नाकर

भेंडी किंचित उष्ण असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रुचकर असते आणि वृष्य म्हणजे शुक्रधातुवर्धक द्रव्यांमध्ये श्रेष्ठ असते।

सौजन्य:ई-सकाळ

No comments:

Post a Comment