Wednesday, September 2, 2009

खूप काही सांगत असते जांभई...

आपण जाम कंटाळलो किंवा वैतागलो की एखादी लांबलचक जांभई देतो. झोप अनावर होऊ लागली की एकापाठोपाठ एक जांभई देत राहतो. आपण आवरू म्हटले तरी आवरता येत नाही जांभया देणं. पण नुसती एवढीच कारणं नसतात जांभई देण्यासाठी.

लहान मूल झोपेतही जांभई का देतं? किंवा आपण भरपूर झोपून उठलो की लगेच तीन - चार जांभया का देतो? यामागची कारणे दोन असतात. मूल झोपेतही जांभई देतं ते आपल्या अवयवांना व्यायाम देण्यासाठी. आपणही चेहऱ्याच्या अवयवांना ताण देत व्यायामच देत असतो. त्याच वेळी शरीरात जमा झालेले दूषित वायू बाहेर फेकत असतो. काही वेळा शरीराला पुरेसा ऑक्‍सिजन मिळाला नाही किंवा शरीरात दूषित वायूचे प्रमाण वाढले तरी जांभया येतात. अशा वेळी काही जणांना चक्कर आल्यासारखेही वाटू शकते. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह असे प्राणीही याच कारणांसाठी जांभया देतात. ही आपल्याला ज्ञात असलेली कारणे झाली. लीड्‌स विद्यापीठातील डॉ. कॅटरिना मॉरिसन यांना मात्र जां भई देणे ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची चुगली करणारी गोष्ट वाटते. एखाद्याला पाहता पाहता जांभई दिली जाणे हे सामाजिक समानुभूतीचे लक्षण आहे. एखाद्याने जांभई दिली की त्याच्या आसपासचेही जांभया देऊ लागतात, त्यामागे मनोवैज्ञानिक कारण आहे. दुसऱ्याच्या अनुभूतीशी स्वतःला जोडून घेणे ही आपलीच मानसिक गरज असते. जांभई देताना आणि दुसऱ्यांविषयी विचार करताना आपल्या मेंदूचा विशिष्ट भाग सक्रिय होतो. एखाद्याला टाळण्यासाठी जशी आपण जांभई देतो, तशी एखाद्याविषयी असणारी आस्थाही व्यक्त होण्यासाठी जांभईच देतो, असे डॉ. मॉरिसन यांच्या संशोधनात आढळले आहे.

No comments:

Post a Comment