Saturday, June 27, 2009

आयुर्वेद::मोर्निंग वाक्

हे शीर्षक वाचुन कुणीही – 'Oh not again' अशीच प्रतिक्रिया दील!. लवकर उठणे, (थंडीच्या दिवसात तर उबदार दुलईच्या कोषातून बाहेर पडायची नुसती कल्पनासुद्धा नकोशी वाटते), वजन, सक्ती, mind body fitness, निवृत्ती, वय, मनाचा प्रतिकार अशा अनेक भावना बहुतांशी लोकांच्या मनात या मॉर्निंग वॉकशी निगडीत असतात. मला मात्र सकाळच्या या फेरफटक्याने नेहमीच आकर्षित केलय. असं का बरं असावं? म्हणतात ना ‘The first impression is the lasting one’ - प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात आपल्याला आलेला पहिला अनुभव फार महत्वाचा ठरतो. तो जर सकारात्मक असेल, तर आपण तशा अनुभवांना अगदी सहज आनंदाने स्वीकारतो. माझे काहीसे तसेच झाले असणार.

माझ्या आयुष्यात मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली ती आजोबांचा हात धरुन ... साडेतीन चार वर्षांची असल्यापासुन ... रोज सकाळी त्यांच्याबरोबर पुढेमागे बागडत आम्ही भाऊ-बहीण जात असू. त्यांच्या नित्यनव्या गोष्टी ऎकायला मिळण हे सर्वात मोठ आकर्षण. किती भव्य दिव्य वाटायचा उगवणारा सूर्य - चारी दिशा उजळून टाकणारी त्याची किरणे आमच्या बालमनाला अवाक् करुन टाकायची. 'आपली सगळी शक्ती तो सुर्यनारायण आपल्याला देतो', आजोबा सांगायचे. रोज नव्या वाटा आणि त्याबरोबर नवे अनुभव. पक्षी, प्राणी, झाडे-फुले प्रत्येकाची माहिती त्यांच्याकडून मिळायची. सगळ्यात पहिल्यांदा अनेक कोंबड्या आणि बदकांमध्ये पाहिलेली टर्की मला अजून आठवते! कोण आनंद झाला होता मला त्या दिवशी - एखादी नवीन अद्भुत गोष्ट पाहिल्याचा.
बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठाले सिमेंटचे पाईप ठेवलेले असायचे. मी आणि माझा भाऊ त्यात गेल्याशिवाय रहायचो नाही. फिरायला जायच्या वाटेवरच आमच ते 'घर'होत! किती मजा येईल अशा घरात रहायला. आजोबा आम्हाला वेगवेगळ्या घरांबद्दल सांगायचे - सिमेंटची, लाकडाची, विटांची आणि बर्फाची घरं ... माझं मन त्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या घरात बागडून यायचं. एक ना दोन ... अशा कितीतरी सुंदर आठवणी त्या सकाळच्या मंगलप्रहरांशी सांधलेल्या आहेत. पाऊस पडून गेल्यावर साचलेल्या पाण्यात पाहिलेल स्वत:चं 'प्रतिबिंब'हा आजोबांनी शिकवलेला नवा शब्द! दिवसभर मी तो घोकत होते. प्रेमातच पडले होते जणू त्याच्या की आपल्याच?

सुट्ट्यांमध्ये आम्हा चुलत आत्तेभावंडांची सकाळ आजोबांच्या मॉर्निंग वॉकने व्यापली जायची! टेकड्यांवरुन झाडाझुड्पातून मुंग्यांची वारुळं, किड्यांची मातीतली घरं, मधमाशांची पोळी, झाडांच्या फांद्यांवर त्यांच्या रंगात बेमालुमपणे मिसळून स्तब्ध पहुडलेले सरडे, सूर्य़प्रकाशात अवचित दृष्टीस पडलेल सुंदर कोळ्यांच जाळ ... निसर्गाची किमया आम्हाला थक्क करुन टाकायची! आजोबा आम्हाला पळसाची पान गोळा करायला सांगायचे - पत्रावळीसाठी कशी पाने हवीत, द्रोणांसाठी कोणती निवडायची - ती टाचण्यासाठी टाचण गोळा करायचं. घरी आल्यावर द्रोण, पत्रावळी बनवण्याचा प्रशिक्षण वर्ग भरायचा. वेड्या वाकड्या असल्या तरी स्वत: तयार केलेल्या पत्रावळीवरच्या जेवणाची चव औरच! दारातच मोठ प्राजक्ताच झाड होत. आजोबांबरोबर फिरून आल्यावर आम्ही सर्व मुलं घरातून रोळ्या आणून फुलं गोळा करायचो. 'टप टप पडती अंगावरती ...' चा अनुभव देणारे आजोबाच. गोळा केलेल्या फुलांच्या देवघरात रांगोळ्या काढ्ल्या जायच्या. रोज नवीन ... पारिजातकाच्या नाजुक फुलांच्या मंद सुवासाच्या आठवणी त्या मॉर्निंग वॉकशी जोडलेल्या आहेत ... पवित्र आणि सात्विक.

आश्चर्य म्हणजे या मॉर्निंग वॉकनी माझा आणि मी त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही! शाळेतल्या मित्र मैत्रिणिंबरोबर सुट्ट्यांमधला तो आमचा अगदी आवडीचा कार्यक्रम असायचा! उन्हाळ्यात अंगावर सकाळचे गार वारे घेत आम्ही सर्व मंडळी घराजवळची टेकडी चढत असू. अगदी वर पोचल्यावर धावत खाली कोण आधी येतं ह्याची शर्यत लागत असे! त्या काळी सुट्ट्यांमधली प्रशिक्षण शिबीर संस्कारवर्ग नव्हते ... मुलांच्या मुक्त मनांना बांध घालायला! टेकडीवर उमलणारी ती रानटी सूर्यफुलं किती आनंदात डोलायची! एरवी रुक्ष दिसणाऱ्या त्या टेकडीवर या शेकडो फुलांच हे पिवळ जर्द पांघरुण कसं तयार होतं याचं आम्हाला नेहमीच कुतूहल वाटायचं. पुढे वर्ड्स्वर्थची Daffodils शिकताना त्याने रेखाटलेले चित्र मला सहज डोळ्यांपुढे साकारता आले!

शाळा कॉलेजात जरा बॅकसीटच घेतलेल्या माझ्या या दोस्ताशी परत भेट शिक्षण संपताच झाली ती वडिलांबरोबर. आपल्यापेक्षा वयानी जास्त असून ते इतक्या भरभर कसे चालू शकतात . मग त्यांनी धाप न लागता, न दमता झपझप चालायचे टेक्निक शिकवलं. कित्येक विषयांवर आमची देवाण घेवाण त्या वेळात होत असे. दोन पिढ्यांमध्ये संवाद साधायची किती सुंदर संधी या सकाळच्या फेरफटक्यामुळे मिळाली!

पुढे लग्न, संसार, मुले, नोकरी ही सगळ्यांच्या पदरी पडणारी कसरत मलाही चुकली नाही. पण गम्मत म्हणजे मुलं (जुळी!) अगदी लहान असताना दिवसभराची दमछाक, रात्रीची जागरणं या सगळ्यामुळे मरगळलेल्या शरीराला तजेला द्यायचा तो मॉर्निंग वॉकच! 'अहो, तुम्हाला वेळ तरी कसा होतो?' हा सगळ्यांना पडलेला प्रश्न! पण खरं सांगू ... त्या सकाळच्या वीस पंचवीस मिनीटांच्या (तेवढीच देऊ शकत होते) झपझप चालण्याने आणि त्याहूनही आधिक ती 'सकाळ'अनुभवल्याने शरीर आणि मन दिवस पेलायला फिट्ट व्हायच!

पुढे पुण्यात आलो ... सकाळच्या या फेरीत वेगवेगळ्या वळणांवरचे बहरणारे वृक्ष टिपायचा मला छंद जडला. ग्लिसरीडियाचे एरवी तापदायक वाटणारे रान आपल्या नाजूक फुलांनी बहरले की वसंत ऋतुची चाहुल लागायची मग जॅकरेंडा, बहावा आणि शेवटी गुलमोहोर! डोळे भरून ती रंगांची उधळण मनाच्या कप्प्यात साठ्वून घ्यायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात आधिकच खुलून दिसणारे ते रंग मग आपोआपच माझ्या जीवनातही उतरू लागायचे! ऋतुप्रमाणे आपली रूपं बदलणारे हे वृक्ष आपल्यासमोर एक रहस्य उलगडु पाहतात ... अविरत बदल हेच न बदलणार सत्य आहे!

नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि त्याबरोबर अनुभवायला मिळणारे पहिल्या प्रहराचे गार मंद वारे, थंडीच्या दिवसात मिळणारी ऊब या सर्वांचा मनावर किती सकारात्मक परिणाम होतो हे प्रत्येकाने अनुभवायलाच हवे! हळुवारपणे जागा होणारा निसर्ग अनुभवा आणि पहा कसा चैतन्यमय होईल तुमचा सबंध दिवस! मला वाटतं, मॉर्निंग वॉकच्या शारीरिक फायद्यांवरच जास्त भर दिला जातो. पण सुदृढ शरीराबरोबरच कितीतरी पटीने जास्त सुद्रुढ मन तयार होतं त्यामुळे! औदासिन्य पळवून लावणारी सूर्याची किरणं मनात उत्साह, चैतन्य आणि हुरूप भरतात ... धरतीच्या कुशीतून डोकावणारा कोंब, दवबिंदू पेलत हळूच उमलणारी एखादी कळी आपल्याला एक नवी आशा दाखवते!

तर मित्रहो .. घेणार ना अनुभव या मॉर्निंग वॉकचा? अगदी चकटफू घेता येणाऱ्या या पॅकेजचे रिटर्न्स भरभक्कम आहेत ... after all,

What is life if full of care

You have no time to stand and stare...



सौजन्य :ई-सकाळ


No comments:

Post a Comment