Sunday, September 13, 2009

फूल ना फुलाची पाकळी


शुद्धी हा फुलांच्या सुगंधाचा पहिला उपयोग. सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण मन असते व त्यामुळे मन शुद्ध, सात्त्विक व प्रसन्न झाले तर रोगपरिहार आपसूक होईल, यात काही संशय नाही.

परमेश्‍वराची पूजा करायची म्हटली, कोणालाही मान द्यायचा म्हटला, कोणाबद्दल आदर दाखवायचा म्हटला, तर कमीत कमी आवश्‍यकता असते फुलाची. "फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी अमुक तमुक देत आहे,' असा वाक्‍प्रयोगही रूढ आहे. मुळात फूल अर्पण करायचे असते. प्रत्येक फुलाचा काहीतरी उपयोग असतोच. फक्‍त एकच फूल असे आहे, की जे दिले असता मनुष्य खजील होतो व ते फूल म्हणजे "एप्रिल फूल'.

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो।

हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्‌ ।

पूजा म्हटली की फूल आवश्‍यक असतेच. हॉस्पिटलमध्ये एखादा आजारी मनुष्य असल्यास फुलांचा गुच्छ नेला जातो. कुणाचा वाढदिवस असेल त्याला पुष्पगुच्छ देतो. मंचावर असलेल्या वक्‍त्याला वा मंचावर एखाद्याचा सत्कार करायचा झाल्यास पुष्पगुच्छ देतो. त्यामुळे पुष्पगुच्छ देणे, हा त्या व्यक्‍तीचा सन्मान असतो. फूल हे सर्वांत महत्त्वाचे. त्याबरोबरीने पुष्कळदा श्रीफळ, शाल, पैसे, भेटवस्तू वगैरे काही दिले जाते. प्रत्येक वेळी पुष्परचना केलेला गुच्छच हवा, मोठा हारच हवा, वा चार फुले हवीत असे नसते, तर एका फुलानेही काम होते.

परमेश्‍वराची पूजा करताना त्याला स्नान घालणे, चंदन, हळद-कुंकू अर्पण करणे वगैरे उपचार करायचे असतील तरी पूजेत फुलाचा मान पहिला असतो. ज्या वेळी इतर कोणतेही उपचार करायचे नसतील तेव्हा एक फूल वाहून नमस्कार केला जातो. असा आहे फुलांचा महिमा.

पुष्प म्हणजे "फूल' हा निसर्गातील एक चमत्कार आहे. बागेत खूप निगा करून वाढवलेल्या झाडाला घातलेले असते नकोसे वाटणारे शेणखत, गांडूळखत वगैरे कुठले तरी खत व पाणी. अशा बागेतल्या झाडाला किंवा कुठल्यातरी वळचणीच्या जागी उगवलेल्या रोपट्याला फूल आल्यावर मात्र लगेच तोडावेसे वाटते. फूल झाडावरच राहिले तरी आसमंतात सुगंध पसरतो. फुलाचा आत्मा सुगंधात असतो. पृथ्वीतत्त्वाचे वास्तव्य सुगंधात असल्यामुळे जणू काही झाडाला दिलेली माती, शेणखत या सर्व माध्यमांतील परमेश्‍वरी अंश सुगंध आहे व ते सुगंधाचे कण बाहेर खेचून काढण्याचे काम झाड करते व परमेश्‍वराचा वास फुलाच्या रूपाने प्रकट करते. म्हणून फुलाला एवढे महत्त्व आहे. शेजारी शेजारी दोन फुटांवर लावलेल्या दोन रोपट्यांना जेव्हा वेगवेगळ्या वासाची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या वजनाची फुले येतात तेव्हा आपले डोके चक्रावून जाते. प्रत्येक फूल हा सृजनाचा अप्रतिम आविष्कार असतो. आपल्याला निसर्गाचा हा चमत्कार असंख्य रूपात पाहता येतो. फुले पाहताना "देता अनंत हस्ते किती घेशील दो कराने' असे जे काही म्हणतात ते अगदी खरे वाटते. अशी विविधरंगी फुले पाहिली की "तेथे कर माझे जुळती' असे शब्द आपसूक ओठांवर येतात व परमेश्‍वराला वंदन करावेसे वाटते.

दृष्टीला सुख होते हा फुलाचा पहिला उपयोग. आपल्या आसपासच्या झेंडूच्या बागा, गुलाबाच्या बागा, ऍमस्टरडॅमला ट्युलिपच्या बहरलेल्या बागा पाहिल्या की मन मोहरून उठते. आसमंतात भरून वाहिलेला सुगंध, पारिजातकाच्या झाडावर फुललेली असंख्य फुले व जमिनीवर पडलेला असंख्य फुलांचा गालिचा पाहिला की स्वर्गसुखाचा अनुभव येतो.

आजच्या ताणतणावाने भरलेल्या व सतत नुसत्या सोयी पाहणाऱ्या लोकांना बिनवासाच्या, कडक दांड्याच्या, अनेक दिवस टिकणाऱ्या गुलाबांचे आकर्षण वाटते व अशी फुले भेट देण्यासाठी उपयोगात आणणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे; पण यामागे साधतो नुसता व्यवहार.

निसर्गातील अनेकविध प्रकारच्या नैसर्गिक फुलांचा उपयोग नुसते आरोग्यच नव्हे, तर पूर्ण जीवन सुखी करण्यासाठी अनंत प्रकारे होऊ शकतो. घराच्या बागेत असलेल्या वेलींवरच्या फुलांचा सुगंध आसमंतात भरून राहिला असता मनात दुष्ट विचार येऊच शकत नाहीत. मनःशुद्धी हा फुलांच्या सुगंधाचा पहिला उपयोग. सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण मन असते व त्यामुळे मन शुद्ध, सात्त्विक व प्रसन्न झाले तर रोगपरिहार आपसूक होईल, यात काही संशय नाही.

प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतो. आम्ही मुले लहान असताना रंगपंचमीच्या आधी काही दिवस पळसाची फुले जमवत असू. आमचे वडील ती फुले पाण्यात उकळवत असत व त्यापासून तयार झालेल्या सुंदर केशरी-पिवळ्या रंगाने आम्ही रंगपंचमी खेळत असू. अंगावर असा रंग पडल्याने पलाशपुष्पाचा उपयोग आपसूक होत असे आणि आजकालच्या रासायनिक रंगांनी जे नुकसान होते ते अनायासेच टळत असे. सध्या मिळणारे असंख्य प्रकारचे रासायनिक रंग वापरून रंगपंचमी खेळल्यास कसा त्रास होतो, हे वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही.

दसरा, नवरात्र म्हटले की दारावर आंब्याची पाने व झेंडूची फुले यांचे तोरण हमखास लागले जाते. असे तोरण दारात लावल्यावर कुठल्या व्हायरसची किंवा कुठल्या दुष्ट शक्‍तीची घरात शिरण्याची बिशाद आहे? व्हायरस व दुष्ट शक्‍तींना बाहेर थोपविण्याचे काम अशा आंब्याच्या पानाच्या व झेंडूच्या फुलाच्या वासाने होते.

फुलांचा नाजूकपणा आपल्याला एखाद्या नाजूक प्रकृतीच्या व्यक्‍तीशी वा नाजूक गोष्टीशी कसे वागावे, हे शिकवतो.

फुलांचे औषधात तर अनेक उपयोग आहेत. फुलांच्या सुगंधाने मधमाश्‍या फुलाकडे आकर्षित होतात व त्या मध तर तयार करतातच; पण बरोबरीने झाडाच्या पुनरुत्पत्तीच्या कार्याला हातभार लावतात.

कमळाचे औषधी उपयोग खूप आहेत. पांढरे, लाल, निळे अशी अनेक रंगांची कमळे पाण्यात वा दलदलीत उगवतात. या सगळ्यांचे औषधी उपयोग वेगवेगळे असतात. एवढेच नाही, तर आपल्या शरीरातही सहा कमळे उमलत असतात व त्यांना चक्र अशी संज्ञा दिलेली असली, तरी त्यांचे अस्तित्व कमळाप्रमाणेच उपयोगी ठरते. अनेक देवतांना, त्यातही श्रीगणेशाला कमळ अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी तर जणू कमळातूनच बाहेर येते व कमळावरच विराजमान असते. कुठल्याही देवतेला कमळपुष्पाचे आसन दिले तर त्याहून मोठे आसन नाही.

कमळ महत्त्वाचे आहे, असे म्हणताना गुलाबाचे महत्त्व कमी होत नाही. पारिजातक, जाई, जुई, चमेली, सायली, सोनचाफा ही फुलेही तेवढीच उपयोगाची असतात. जास्वंदीच्या फुलाला खास सुगंध नसला तरी आकार व या फुलाचा मनमोकळेपणा सर्वांना आकर्षित करतो. लाल व पांढऱ्या जास्वंदीचे आयुर्वेदात उपयोग आढळतात. जास्वंदीची फुले असंख्य रंगांची आढळतात.

आयुर्वेदात सांगितलेली आसवे तयार करताना, काढे आंबवण्यासाठी (फर्मेंटेशनसाठी) फुलांचाच उपयोग केलेला असतो. अशी फुलाच्या मदतीने बनविलेली आसवेच खरी गुणकारी ठरतात. यीस्ट टाकून तयार केलेले आसव तेवढे परिणामकारक ठरत नाही.

हिरवा चाफा, कवठी चाफा यांचेही सुगंध मनमोहक असतात. रातराणीचा वास तर नाग व सर्पांनाही आकर्षित करतो, असे म्हणतात.

देशपरत्वे फुले बदलतात. हाय-वेच्या मध्ये लावलेली कण्हेरीची झाडे जशी भारतात दिसतात तशी इटलीतही दिसतात. लाल फुलांची व पांढऱ्या फुलांची, अशा कण्हेरीच्या दोन जाती असतात. आयुर्वेदाने कण्हेरीच्या फुलांचाही उपयोग सांगितलेला आहे.

धोत्र्यासारख्या झाडालाही फुले येतात. पांढरा धोत्रा व काळा धोत्रा या दोन्हींच्या फुलांचा वापर आयुर्वेदात केलेला दिसतो.

स्त्रिया फुले डोक्‍यात घालतात. सुवर्णाचे फूल डोक्‍यात घातले जात असले व स्त्री सुवर्णाचे फूल घातल्याने अधिक प्रसन्न होत असली, तरी सौंदर्य खरी नैसर्गिक फुले डोक्‍यात घालण्यानेच खुलते.

देवाला हजार, लाख फुले वाहण्याचे संकल्पही केले जातात. ज्या फुलांचा सडा पडतो अशी फुले झाडाखाली साफ-सफाई करून सारवलेल्या जमिनीवर घ्यावी, असे म्हणतात.

जाई, जुई, मोगरा ही संध्याकाळी उमलणारी फुले स्त्रियांना अतिशय प्रिय असतात. ही फुले वातावरण धुंद करायला मदत करतात.

ंफुलांचे आकारही वैविध्यपूर्ण असतात. काही फुलांना त्याच्या आकारावरूनही नाव दिलेले दिसते उदा. गायीच्या कानासारखे गोकर्ण. कैलासपतीच्या फुलाच्या खालच्या भागाची रचना महादेवाची पिंडी असल्यासारखा असतो व शेषनागाने पिंडीवर फणा धरून ठेवली आहे अशा आकारात पाकळ्यांची रचना झालेली असते. या अलौकिक रचनेवरून फुलाचे नाव सार्थक झालेले दिसते. या फुलाला अप्रतिम सुगंध असतो.

गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. काही फुले पाण्यात उकळून त्याचा वाफारा श्‍वसनरोगांसाठी उपयोगी असतो.

ज्या फुलांपासून पुढे फळे तयार होतात अशाही फुलांचे सौंदर्य व सुगंध मनमोहक असतात. ऍस्टर, डेलियासारख्या फुलांना वास नसला तरी त्यांचे सौंदर्य काही और असते.

कदंबाची फुले लक्ष्मीला प्रिय असतात व ही चेंडूसारखी गोल गरगरीत असतात व त्याच्या संपूर्ण अंगावर सुयांसारखे असंख्य धागे असतात. या फुलांचा वास खूप दूरवर पसरतो. केवड्याला अप्रतिम सुवास असतो; पण केवडा दिसतो पानासारखा. बाहेरच्या बाजूला टोकदार सुवासिक पाने व आत मधल्या दांड्याला पुंकेसर असतात. केवडा श्रीगणेशाला प्रिय असतो. केवड्यापासून बनविलेले अत्तरही सूक्ष्म असून अत्यंत लोकप्रिय आहे.

सध्या ताजी फुले मिळणे दुरापास्त होत चालले आहे व त्याचे उपयोगही कळो झाले आहेत. बाजारात मिळणारी काही फुले खरी असली तरी ती जोपासताना अशी खते व रसायने वापरली जातात, की ती कृत्रिम वाटतात. आजकाल हलके हलके प्लॅस्टिकची फुले बाजारात येऊ लागली आहेत. प्लॅस्टिकची फुले कितीही हुबेहूब दिसली तरी त्यात ना कोमलता ना सुगंध. काही प्लॅस्टिकची फुले पाहिल्यावर अशीही फुले असतात का, अशीही शंका बऱ्याच वेळा मनात येते. पण इतर देशात फिरत असता तशी नैसर्गिक फुले पाहायला मिळतात व जाणवते की परमेश्‍वराची लीला अगाध आहे व वेगवेगळ्या आकारांची, रंगांची, सुगंधांची फुले पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत. म्हणून असे वाटते, की "काळा गुलाब वा निळा गुलाब आणून दिल्यास मी लग्न करीन' असे म्हणणारी राजकन्या या पृथ्वीच्या पाठीवर असू शकेल.

डॉ. श्री बालाजी तांबे

फुलांचा औषधी उपयोग


सर्व प्राचीन संस्कृतीने सुगंधाचा, फुलांचा आरोग्याशी संबंध जोडला आहे असे दिसते. भारतीय संस्कृतीत देवदेवतांना सुगंधी पुष्प, धूप अर्पण करण्याची पद्धत पुरातन काळापासून आहेच; पण इजिप्त, चीन, जपान येथेही सुगंध, धूप या संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसते. आयुर्वेदात "पुष्पवर्ग' म्हणजे औषधी फुलांची विशेष माहिती देणारा असा वेगळा वर्ग सांगितला आहे, तर आधुनिक काळात "अरोमा थेरपी' या नावाने जगासमोर ही उपचार पद्धती आलेली आहे.

औषध म्हणून एखाद्या वनस्पतीचे पंचांग वापरावे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यात फुलांचाही समावेश असतो. मूळ, खोड वा खोडाचे साल, पाने, फळ व फूल अशी पंच-अंगे असतात. साधारणतः फूल म्हटले की सुगंध आठवतो. सुगंध हा शरीर-मनाला ताजेपणा, स्फूर्ती देणारा गुण असल्याने औषधांमध्ये फुलांचे योगदान मोठे असते. सुगंधामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत मिळते, प्रसन्नता प्रतीत होते. बहुतेक सर्व सुगंधयुक्‍त फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतात, पण फारसा सुगंध नसलेलीही अनेक फुले औषधात वापरली जातात. "भावप्रकाशा'त "पुष्पवर्ग' म्हणजे औषधी फुलांची विशेष माहिती देणारा असा वेगळा वर्ग सांगितला आहे.

मोगऱ्याची फुले सुगंधी असतात. मोगऱ्याचे गजरे आजही वापरले जातात. बऱ्याच घरांत मोगऱ्याचे एखादे झाड असतेच.

मुद्‌गरो मधुरः शीतः सुगन्धिश्‍च सुखप्रदः।

कामवृद्धिकरश्‍चैव पित्तनाशकरो मतः ।।

...निघण्टू रत्नाकर

मोगऱ्याचे फूल मधुर, शीतवीर्याचे, सुगंधी व सुखप्रद असते. कामवर्धक व पित्तनाशक असते.

उष्णता वाढल्याने नाकात फोड येतो, त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा नुसता वास घेतल्याने बरे वाटते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यात मोगऱ्याची फुले टाकली असता ते सुगंधी बनते व असे सुगंधी पाणी पिण्याने उष्णता कमी होण्यास मदत मिळते. मोगऱ्याचा थेंबभर अर्क बत्ताशासह सेवन केल्यास वाढलेले पित्त कमी होते व बरे वाटते.

गुलाब

गुलाबाची फुले प्रसिद्ध आहेत, पण औषध म्हणून वापरायचा देशी गुलाब गुलाबी रंगाचा, सुगंधी व कोवळ्या पाकळ्या असणारा असतो. सुगंध नसणारी गुलाबाची फुले फक्‍त शोभेची असतात.

शतपत्री हिमा हृद्या ग्राहिणी शुक्रला लघुः। दोषत्रयास्रजित्‌ वर्ण्या कट्‌वी तिक्‍ता च पाचनी ।।

...भावप्रकाश

गुलाब वीर्याने शीत असतो, हृदयासाठी हितकर असतो, शुक्रवर्धक व वर्णकारक असतो. चवीला कडू, तिखट असला तरी तिन्ही दोषांना संतुलित करणारा असतो आणि पाचकही असतो.

गुलकंद हे गुलाबाच्या फुलांपासून तयार होणारे प्रसिद्ध औषध होय. गुलकंदामुळे पित्त कमी होते, कांती उजळते, ताप, गोवर, कांजिण्या वगैरे रोगांनंतर शरीरात राहणारी कडकी दूर होते. गुलाब शौचाला साफ होण्यास मदत करतो. डोळ्यांची आग होत असता किंवा डोळे थकले असता पापण्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो.

कमळ

गणपतीला व देवीला वाहण्यासाठी कमळ वापरण्यात येते. कमळ हे एक मोठे औषध आहे.

कमलं शीतलं वर्ण्यं मधुरं कफपित्तजित्‌ ।

...भावप्रकाश

कमळ थंड, वर्ण सुधारणारे, चवीला मधुर व कफ-पित्तदोष कमी करणारे असते. लाल, पांढरे व निळ्या रंगाचे कमळ असते. कमळाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे ते हृदयाची शक्‍ती वाढवते. हृदयाची धडधड होत असता, हृदय अशक्‍त झाले असता कमळाच्या फुलाचे चूर्ण, मध, लोणी व खडीसाखर यांचे मिश्रण दिले जाते. पद्मघृतासारखा कमळापासून बनविलेला योगही हृद्‍रोगावर अतिशय उपयुक्‍त असतो. कमळाच्या फुलाचे चूर्ण मध, लोणी व खडीसाखरेसह घेण्याने स्त्रियांचे अंगावरून जाणे थांबते.

जाई

पांढऱ्या फुलांची जुई-जाईची वेल घराबाजूच्या बागेत असते.

पुष्पं सुगन्धि संप्रोक्‍तं मनोज्ञं कफपित्तनुत्‌ ।

...निघण्टू रत्नाकर

जाईचे फूल अतिशय सुगंधी, दिसायला मनोहर व कफ-पित्तशामक असते. जाईच्या कळ्या नेत्ररोग, त्वचारोग, जखमा, फोड येणे वगैरे तक्रारींवर उपयुक्‍त असतात.

जुई

सुगन्धी वातकफकृत्‌ पित्तदाहतृषापहा।

त्राश्‍मरी च त्वग्दोषं रक्‍तदोषं व्रणं तथा ।।

...निघण्टू रत्नाकर

जुईचे फूल सुगंधी असून, पित्तदोष कमी करते, दाह शमवते, तृष्णा भागवते. मुतखडा, त्वचाविकार, रक्‍तदोष, जखमा, दंतरोग, नेत्ररोग, मुखरोग, शिरोरोग वगैरेंमध्ये हितकर असते. विषाचा नाश करते, तसेच तापामध्ये हितकर असते.

सोनचाफा

चम्पक कटुकस्तिक्‍तः कषायो मधुरो हिमः ।

विषक्रिमिहरः कृच्छ्रकफवातास्रपित्तजित्‌ ।।

...भावप्रकाश

सोनचाफा चवीला गोड, तिखट, कडू व तुरट असतो. वीर्याने शीत असतो. विषदोषाचे शमन करतो, रक्‍तदोष दूर करतो. सोनचाफ्याच्या सुगंधामुळे हवा शुद्ध होते.

बकुळ

बकुळीचा मोठा वृक्ष असतो व सकाळी झाडाखाली छोट्या सुगंधी फुलांचा सडा पडलेला असतो.

तत्पुष्पं रुचिरं शीतं मध्वाढ्यं मधुरं मतम्‌ ।

सुगन्धि स्निग्धकषायम्‌ ।।

.....भावप्रकाश

बकुळीची फुले वीर्याने थंड व गोड सुगंधाची असतात, रुची वाढवतात, चवीला मधुर व तुरट असून, गुणाने स्निग्ध असतात. लहान बालकाला खोकला झाला असता बकुळीची फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी गाळून घेऊन ते पाणी प्यावयास देतात. बकुळीची ताजी फुले खडीसाखरेसह खाल्ल्यास व वरून थंड पाणी प्यायल्यास हलणारे दात मजबूत होतात, असे सांगितले जाते.

मेंदीची फुले

मेंदीची फुले थंड असतात व त्यांना विशेष असा मादक सुगंध असतो. डोके दुखण्यावर मेंदीच्या फुलांचा चांगला उपयोग होताना दिसतो. मेंदीची फुले ठेचून तयार केलेला काढा दूध व साखरेसह घेतल्यास डोकेदुखी कमी होते. मेंदीची पाने वाटून केसाला, तळहातांना व तळपायांना लावल्याने रंग छान दिसतो व शरीरातील उष्णता कमी होते.

आंब्याचा मोहर

आंब्याचा मोहर सुगंधी असतो. वसंतात आंब्याचा मोहर आला की वातावरण सुगंधी होते. स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आंब्याचा मोहर तुपात तळून खायला दिला जातो.

डाळिंबाचे फूल

डाळिंब हे फळ म्हणून सर्वांना माहिती असते, पण डाळिंबाच्या फुलाची कळी- म्हणजेच अनारकली अतिशय सुंदर दिसते. डाळिंबाच्या फुलाचा रस नाकात टाकला असता उष्णतेमुळे नाकातून पडणारे रक्‍त बंद होते.

धायटी

धायटीची फुले लाल रंगाची असतात. गर्भाशयाच्या रोगांवरचे हे एक मोठे औषध समजले जाते. धायटीच्या फुलांचा काढा घेतल्यास योनीवाटे अतिरक्‍तस्राव होणे थांबते. गर्भधारणा होण्यासाठीही धायटीची फुले सहायक असतात. धायटीची फुले आसव-अरिष्टे बनविण्यासाठी वापरली जातात, यामुळे संधानप्रक्रिया व्यवस्थित होते.

जास्वंद - जपाकुसुम

जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावला असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.

पळस

"पळसाला पाने तीन' अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पळसाच्या वृक्षाला लाल रंगाची फुले येतात. पळसाची फुले लघवी साफ होण्यासाठी उत्तम असतात. लघवी अडली असल्यास किंवा थांबून थांबून होत असल्यास पळसाची फुले वाफवून ओटीपोटावर बांधली जातात. पळसाच्या फुलांचे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घेण्यानेही लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

मोह

मोह नावाचे मोठे वृक्ष असतात. मोहाची फुले अतिशय सुंदर व मंद सुगंध असणारी असतात. मोहाच्या फुलांचाही आसव-अरिष्टे बनविण्यासाठी वापर केला जातो. मोहाची फुले थंड व पौष्टिक असतात. मोहाची फुले व खडीसाखरेपासून गुलकंदाप्रमाणे मोहकंद तयार केला जातो. या मोहकंदामुळे कडकी नष्ट होते व शक्‍ती वाढते.

शेवगा

शेवग्याच्या शेंगेप्रमाणे शेवग्याच्या फुलांची रुचकर भाजी केली जाते. शेवग्याची फुले चवीला तिखट, वीर्याने उष्ण व डोळ्यांना हितकर असतात. वातरोग, सूज, जंत, प्लीहावृद्धी वगैरे विकारांवर शेवग्याची फुले उत्तम असतात.

या प्रकारे पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालण्यात अग्रणी असणारी फुले आरोग्यासाठीही महत्त्वाची असतात.

इतिहासाकडे पाहिल्यास सर्व प्राचीन संस्कृतींत सुगंधाचा, फुलांचा आरोग्याशी संबंध जोडल्याचे लक्षात येते. भारतीय संस्कृतीत देवदेवतांना सुगंधी पुष्प, धूप अर्पण करण्याची पद्धत पुरातन काळापासून आहेच, पण इजिप्तच्या इतिहासातही सुगंध, धूप या संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसते. चीन, जपान वगैरे देशांतही देवदेवतांची स्तुती करण्यासाठी सुगंधाचा वापर केला जात असे.

आयुर्वेदात सुगंधाचा, सुगंधी फुलांचा आरोग्याशी संबंध असतो, हे दाखविणारे असंख्य उल्लेख आहे. आधुनिक काळात "अरोमा थेरपी' नावाने जगासमोर आलेली उपचार पद्धती आयुर्वेदातील सुगंध-उपचाराचाच एक भाग आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये.
डॉ. श्री बालाजी तांबे

Wednesday, September 2, 2009

महत्वपूर्ण दूध

लहानपणापासून मातृ-दूध व गाईचे दूध घेतल्यास पुढच्या आरोग्याचा पाया भक्कम तयार होतो. पण अलीकडच्या काळात दूधदुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच; पण त्याचबरोबर चुकीचे दूध सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले आहेत.

अ लीकडे लोकांना चरबी वाढण्याची भीती वाटू लागली. वजन वाढेल या भीतीमुळे अनेकांनी दूधदुभत्याकडे वाकडी नजर केली, तरी ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत महादेवावर दुधाचा अभिषेक मात्र चालू राहिलेला दिसतो. पाऊस पडला नाही म्हणून महादेवाच्या मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरायचा असे सर्व गावकऱ्यांनी ठरविले व दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी सर्वांनी एक एक लोटा दूध गाभाऱ्यात ओतायचे हे पण ठरले. अशा प्रकारे महादेवाला संकटात टाकले, की पाऊस येईल ही सर्वांची अपेक्षा होती. ठरलेल्या दिवशी पुजाऱ्याने दुधात बुडालेला महादेव दिसेल अशा अपेक्षेने सर्वांच्या उपस्थितीत पहाटे मंदिर उघडले, तेव्हा दिसले, की महादेव पाण्यात बुडालेला आहे. पूर्ण गाभारा पाण्याने भरलेला आहे. सर्व जण दूध टाकणार आहेतच, आपण एक लोटा पाणी टाकले, तर फार काही बिघडणार नाही असा विचार सर्वांनी केला व सर्वांनीच एक एक लोटा पाणी टाकले होते.

एकूण काय तर दुधात पाणी टाकायचे वा पाण्यासारखे दूध प्यायचे ही सवय लोकांना फार पूर्वीपासून लागली असावी. दुधात बोट घालून वर काढल्यावर बोट पांढरे दिसावे, म्हणजे बोटाला सर्व बाजूंनी दूध चिकटले तर ते दूध चांगले असते. साधारण दुधात ४-४.५ टक्के फॅट असली, तर ते दूध चांगले मानले जाते. दुधाचे भाव तर वाढत राहिले आहेतच; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत होत दोन टक्‍क्‍यांवर आलेले आहे. त्यामुळे दूध तापवल्यावर त्यावर पातळ कागदासारखी साय येते असे दिसते. लोक असेच दूध सेवन करू लागल्याचे दिसते. अधिक प्रमाणात फॅट असलेले दूध प्रकृतीला अहितकर असते; कारण त्यामुळे शरीरातील चरबी वाढते, असा सोईस्कर गैरसमज रूढ होऊ लागला. दूध नसलेले पांढरे पाणी वा पावडर (नॉन डेअरी प्रॉडक्‍ट्‌स) टाकल्यावर चहाला रंग आणण्याची शक्कल काही मंडळींनी शोधून काढली. प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये वा विमानप्रवासात असे नॉन डेअरी प्रॉडक्‍ट्‌स दिले जाऊ लागल्यावर काही मंडळींनी रसायने वापरूनच दूध बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांमुळे चहाला पांढरा रंग येण्याआधी डोळे पांढरे होण्याची वेळ आली. अशी परिस्थिती आल्यावर मात्र लोकांचे डोळे उघडले. हे दूधदुभत्याचे काय नाटक सुरू आहे हे भगवानच जाणे.

ज्या वेळी ताजे दूध मिळत असे, त्या दुधावर बोटभर जाडीची साय येत असे. जेव्हा लोक लस्सी जाड मलई टाकून घेत असत, मलईचे श्रीखंड, मलईचा खवा, मलईचे पेढे व कणीदार तूप खात असत तेव्हा माणसे धष्टपुष्ट होती, रोगही त्यामानाने सोपे होते. मथुरा, वृंदावन या बाजूला सकस दुधाचा एवढा छान व्यापार होता, की त्या दुधावर पोसलेले मल्ल रस्त्यातून जाऊ लागल्यावर हल्ली एखादा भारी वजन असलेला ट्रक रस्त्यातून गेला, की घरात जसा अनुभव येतो तसा अनुभव येत असे. आता ते दूधदुभते गेले व मल्लही गेले. आज रोगांचे प्रमाण अतोनात वाढलेले दिसते. औषधपाण्याच्या खर्चाने ट क्कल पडेल असे वाटत असले, तरी दूधदुभत्याचा अभाव हेच टक्कल पडण्याचे मुख्य कारण आहे. ताज्या दुधाबाबत एक अडचण असते, की काढल्यावर काही तासांच्या आत ते तापवावे लागते, अन्यथा ते नासते. त्यामुळे पहाटे उठून गाई-म्हशींचे दूध काढायचे व गिऱ्हाइकांना पुरवायचा हा एक मोठा द्राविडी प्राणायाम असतो. पूर्वी ताजे दूध बाटल्यांतून येत असे तेव्हा सकाळी लवकर उठून दूध केंद्रांवरून दूध आणून लगेच तापवणे हे एक नित्याचे काम असे. कपडे धुवायला मशिन, कणीक मळायला मशिन, जिना चढायला लिफ्ट अशा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या तसतसे लोकांना सकाळी उठून दूध आणायला जाणे अवघड होऊ लागले. शहरांची अतोनात वाढ झाल्यामुळे गाई-म्हशी राहत्या वस्तीपासून दूरवर गेल्या, पर्यायाने दूधदुभतेही माणसापासून दूर गेले. त्यामुळे दूध अधिक कसे टिकेल याचे प्रयत्न होऊ लागले. महिनोन्‌ महिने न तापवता खोक्‍यात टिकणारे दूध तयार झाले; पण हेच दूध सेवन केल्यावर महिनोन्‌ महिने न पचता पोटात राहू लागले. कच्च्या दुधावरचे क्रीम काढून घेऊन त्यापासून पुढे सर्व पदार्थ बनवून सामान्यांना उपलब्ध करून देणे हा व्यवसाय सुरू झाला. दुधाचा महापूर आल्यासारखे वाटले, तरी सामान्यांना खरे दूधदुभते दुर्मिळ झाल

े. उपलब्ध असलेल्या दुधाचा शरीराला काडीमात्र उपयोग राहिला नाही.

दुधात प्राणिज एन्झाईम्स असल्याने दूध वाळवणे खूप अवघड असते; पण काही विशिष्ट पद्धतीने दुधाची पावडर बनवणे सुरू झाले. या दुधाच्या पावडरपासून बनविलेले दूध पचणे अवघड असते. दूध तापवून वेगळ्या केलेल्या सायीला विरजण लावून लोणी व त्यापासून तूप बनविणे ही खरी लोणी व तूप बनविण्याची भारतीय पारंपरिक पद्धत आहे. दही बन विण्यासाठी वापरलेला संस्कार म्हणजे विरजण प्राणिज बॅक्‍टेरिया असलेले असणे आवश्‍यक असते. दूध-तुपाची शुद्ध म्हणून जाहिरात केली गेली व ते तसे असले तरीही मुळात बनविण्याच्या प्रक्रियेची शुद्धता पाळणे टाळले जाऊ लागले. गुरांना भलतेच खाद्य देणे, नंतर दूध थोडेसे तापवून क्रीम काढून घेणे, त्या क्रीमवर प्रक्रिया करून लोणी-तूप वगैरे बनविणे हेच मुळात चुकीचे व अशुद्ध म्हणावे लागेल. या सर्व क्रिया रासायनिक पद्धतीने सुरू झाल्या, ज्यामुळे सर्व प्रक्रिया चटकन होऊ लागल्या व त्यापासून बन विलेल्या लोणी-तुपाचे दुर्गुणही लक्षात येईनासे झाले; पण असे पदार्थ सेवन केल्यावर त्याचे दुष्परिणाम होणे अटळ होते.

दूधदुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच; पण त्याचबरोबर चुकीचे दूधदुभते सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले. खाल्लेल्या अन्नाचे शक्‍तीत रूपांतर होईपर्यंत जी सप्तधातूंची वाढ होणे अपेक्षित असते ती वाढ न होता, असंतुलन होऊन रोग वाढीला लागले. रोगांची लक्षणे दूर होतील अशी औषधे शोधली गेली; पण रोग आटोक्‍यात येईनासे झाले. लहानपणापासून मातृ-दूध व गाईचे दूध घेतल्यास पुढच्या आरोग्याचा पाया भक्कम तयार होतो. पायाच भक्कम नसेल म्हणजे शरीर, हाडे, शुक्र वगैरे कमकुवत राहिली, तर शरीररूपी इमारतीला डागडुजी करून त्या घरात शांतपणे राहता येणार नाही.

डॉ. श्री बालाजी तांबे

खूप काही सांगत असते जांभई...

आपण जाम कंटाळलो किंवा वैतागलो की एखादी लांबलचक जांभई देतो. झोप अनावर होऊ लागली की एकापाठोपाठ एक जांभई देत राहतो. आपण आवरू म्हटले तरी आवरता येत नाही जांभया देणं. पण नुसती एवढीच कारणं नसतात जांभई देण्यासाठी.

लहान मूल झोपेतही जांभई का देतं? किंवा आपण भरपूर झोपून उठलो की लगेच तीन - चार जांभया का देतो? यामागची कारणे दोन असतात. मूल झोपेतही जांभई देतं ते आपल्या अवयवांना व्यायाम देण्यासाठी. आपणही चेहऱ्याच्या अवयवांना ताण देत व्यायामच देत असतो. त्याच वेळी शरीरात जमा झालेले दूषित वायू बाहेर फेकत असतो. काही वेळा शरीराला पुरेसा ऑक्‍सिजन मिळाला नाही किंवा शरीरात दूषित वायूचे प्रमाण वाढले तरी जांभया येतात. अशा वेळी काही जणांना चक्कर आल्यासारखेही वाटू शकते. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह असे प्राणीही याच कारणांसाठी जांभया देतात. ही आपल्याला ज्ञात असलेली कारणे झाली. लीड्‌स विद्यापीठातील डॉ. कॅटरिना मॉरिसन यांना मात्र जां भई देणे ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची चुगली करणारी गोष्ट वाटते. एखाद्याला पाहता पाहता जांभई दिली जाणे हे सामाजिक समानुभूतीचे लक्षण आहे. एखाद्याने जांभई दिली की त्याच्या आसपासचेही जांभया देऊ लागतात, त्यामागे मनोवैज्ञानिक कारण आहे. दुसऱ्याच्या अनुभूतीशी स्वतःला जोडून घेणे ही आपलीच मानसिक गरज असते. जांभई देताना आणि दुसऱ्यांविषयी विचार करताना आपल्या मेंदूचा विशिष्ट भाग सक्रिय होतो. एखाद्याला टाळण्यासाठी जशी आपण जांभई देतो, तशी एखाद्याविषयी असणारी आस्थाही व्यक्त होण्यासाठी जांभईच देतो, असे डॉ. मॉरिसन यांच्या संशोधनात आढळले आहे.

अन्नयोग

अन्नाची रुची वाढवण्यासाठी हरित म्हणजे कच्च्या स्वरूपात काही पदार्थांचे सेवन करता येते. मात्र हरित वर्गातली द्रव्ये व फळे वगळता इतर सर्व भाज्या, धान्ये अग्निसंस्कार करून मगच सेवन करायला हवीत.

कोशिंबीर म्हणून किंवा अन्नाची रुची वाढवण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हरित वर्गाची आपण माहिती घेत आहोत. ही सर्व द्रव्ये ताजी वापरायची असतात व योग्य प्रमाणात कच्ची खाल्ली तरी चालण्यासारखी असतात.

गाजर

गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।

संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।

...भावप्रकाश

गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणी मध्ये पथ्यकर असते तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.

गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते, मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.

कांदा

पांढरा व लाल असे कांद्याचे दोन प्रकार असतात. दोघांचे वेगवेगळे गुणधर्म आयुर्वेदात दिलेले आहेत

श्‍वेतः पलाण्डुर्बल्यः स्यात्‌ स्वादुर्वृष्यो गुरुः कटुः ।

रुच्यः स्निग्धः कफकरो धातुवृद्धिकरो मतः ।।

निद्राकरो दीपकः स्यात्‌ क्षयहृद्रोगनाशनः ।

...निघण्टु रत्नाकर

पांढरा कांदा बलदायक, चवीला गोड, तिखट व पचायला जड असतो, शुक्रधातूला वाढवतो, रुची वाढवतो, स्निग्ध गुणाचा असतो, अग्निसंदीपन करतो, झोप येण्यास मदत करतो व क्षयरोग, हृदयरोग, मूळव्याध, उलटी, रक्‍तविकार वगैरे रोगात हितकर असतो.

बाह्यतः वापरला असता कांदा थंड असतो म्हणून उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्‍यावर टोपीच्या आत कांदा ठेवण्याची पद्धत दिसून येते. तापात हाता-पायांची जळजळ होते तेव्हाही कांद्याचा कीस बांधण्याचा उपयोग होतो. नाकातून रक्‍त पडल्यास नाकात कां द्याच्या रसाचे २-३ थेंब टाकले जातात.

लाल कांदा

गुरुः कटुश्‍च मधुरः किंचित्‌ उष्णश्‍च पित्तलः ।

वृष्यो बलकरः प्रोक्‍तः कफं वातं च शोथकम्‌ ।।

अर्शः कृमीन्नाशयतीत्येवं प्रोक्‍ता गुणाः खलु ।।

..निघण्टु रत्नाकर

पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा थोडा उष्ण असतो, चवीला तिखट गोड असणारा लाल का ंदा पचायला जड असतो, पित्तकर असतो, मात्र कफ-वातदोषांचे शमन करतो, का मोत्पादक असतो, ताकद वाढवतो, मूळव्याध, जंत व सूज यांचा नाश करतो.

अन्नाची रुची वाढवण्यासाठी कांद्याचा योग्य प्रमाणात वापर करता येतो, मात्र कांद्यामध्ये उत्तेजित करण्याचा स्वभाव असल्याने कच्चा कांदा अतिप्रमाणात, विशेषतः रात्री खाणे टाळणे चांगले असते. शुक्रदोष असणाऱ्यांनी किंवा झोपेत वीर्यप्रवर्तन वगैरे त्रास असणाऱ्यांनी रात्री कच्चा कांदा किंवा दह्यासह कांद्याची कोशिंबीर वगैरे खाणे टाळावे असा वृद्धवैद्याधार आहे.

लसूण

लसणाचे वैशिष्ट्य असे, की त्याच्यात षड्रसांपैकी आंबट रस सोडला तर बाकीचे पाचही रस आहेत. म्हणून संस्कृतमध्ये लसणाला रसोन (रस+उणे) असे म्हणतात.

लसणाचा कंद तिखट असतो, पाने कडू असतात, दांडा तुरट तर दांड्याचे टोक खारट असते, बीज मधुर असते. योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे लसूण खाण्याने अनेक फायदे होऊ शकतात.

लशुनं पाककाले च रसकाले कटु स्मृतम्‌ ।

रसायनं गुरुं प्रोक्‍तमुष्णं वृष्यं च वीर्यदम्‌ ।।

तीक्ष्णं स्निग्धं पाचकं च भग्नसन्धानकारकम्‌ ।

पित्तलं कण्ठ्यं च रक्‍तकोपकरं मतम्‌ ।।

...निघण्टु रत्नाकर

लसूण चवीला तिखट तसेच विपाकानेही तिखट असतो, वीर्याने उष्ण व पचायला जड असतो पण शुक्रधातू वाढवतो, लसूण रसायन गुणांनी युक्‍त असतो.

लसूण गुणांनी स्निग्ध व तीक्ष्ण असतो, पाचक असतो, तुटलेले हाड सांधण्यासाठी उत्तम असतो, घशासाठी हितकर असतो, पित्त वाढवतो आणि रक्‍तप्रकोप करवतो. वातश मनासाठी लसूण हे एक मोठे औषध असते. तुपात तळलेला लसूण प्रकृतिनुरूप योग्य प्र माणात खाणे आमवात, संधिवात व इतर वातविकारात हितकर असतो. मात्र लसूण तीक्ष्ण व पित्तकर असल्याने कच्चा खाणे अयोग्य समजले जाते. लसणाच्या पातीची हिरवी चटणी किंवा लसणाची कोरडी चटणी ऋतू व प्रकृतीचा विचार करून खाता येते. त्यातही एका पाकळीचा लसूण औषधी गुणांनी श्रेष्ठ असतो. जुलाब उलट्या होत असता, रक्‍तस्राव होत असता तसेच गर्भवती व बाळंतिणीने लसूण खाऊ नये.

अशा प्रकारे आयुर्वेदाने हरित म्हणजे कच्च्या पदार्थांचा वेगळा वर्ग सांगितला आहे. यावरून एक गोष्ट अजून लक्षात येऊ शकते की इतर सर्व भाज्या शिजवून खाणे अपेक्षित असते. कच्च्या दुधीचा रस पिणे, कारल्याचा रस पिणे किंवा भाज्या न शिजवता सॅलड म्हणूून कच्च्याच खाणे अपेक्षित नाही. कोशिंबीर म्हणून हे पदार्थ खातानाही काही विशिष्ट द्रव्यांसह खायचे असतात, उदा. काकडीची कोशिंबीर करताना त्यासह दाण्याची पूड मिसळली जाते. हरित वर्गातली द्रव्ये व फळे सोडता इतर सर्व भाज्या, धान्ये अग्निसंस्कार करून मगच सेवन करायला हवीत.

डॉ. श्री बालाजी तांबे