Monday, August 3, 2009

जीवनसंगीत

'आरोग्यसंगीता'चा उपयोग केल्याने नुसते वैयक्‍तिकच नव्हे; तर एकूण वातावरणाचे, सर्व सृष्टीचे व निसर्गाचे संतुलन होईल. म्हणजे आरोग्यसंगीमुळे नुसते रोगनिवारण न होता संपूर्ण विश्‍वात आरोग्यसंतुलनाचा अनुभव घेता येईल.

संगीत म्हणजेच जीवन. सर्व विश्‍वाची उत्पत्ती नादापासून झालेली आहे आणि स्वर-ताल यांची एक अप्रतिम रचना म्हणजे हे जीवन! या जीवनात स्वर वा ताल बिघडला तर आनंद मिळत नाहीच पण एकूणच जीवन नकोसे वाटते. संगीताचेही असेच असते. संगीतामध्ये सूर व तालाला खूप महत्त्व असते. संगीत जोपर्यंत स्वरात व तालात सुरू असते तोपर्यंत ते कर्णमधुर असते. जीवनात प्रत्येक व्यक्‍ती कुठल्यातरी सृजनाचा आनंद घेत असते तसेच संगीतात कविता मिसळली जाते तेव्हा ते संगीत पूर्णत्वाला पोचते. मनुष्यमात्रामध्ये वा प्राणिमात्रांमध्ये असंतुलनातून रोगोत्पत्ती होते. असंतुलनामुळे हृदयाचा ठोका चुकतो, वातावरणाचे संतुलन बिघडते वा एकूणच जीवनाची घडी विस्कटते असे म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदानुसार प्रज्ञापराधामुळे रोग होतो असे समजले जाते. स्वर, ताल व कविता यांचे असंतुलन म्हणजे प्रज्ञापराध. मनुष्याच्या बाबतीत विचार केला असता शरीर, मन व आत्मा यांचा एकमेळ होत नाही तेव्हा होतो प्रज्ञापराध व त्यातून उत्पन्न होतो रोग.

संगीत जर जीवनाशी एवढे समरस झालेले असेल, जीवन म्हणजेच संगीत असेल तर असंतुलन दूर करण्यासाठी संगीताचा अवश्‍य उपयोग व्हावा. ज्यावेळी मनुष्यमात्रांचे आरोग्य व्यवस्थित असते, जीवनात चालणाऱ्या कार्यामुळे ध्येयाकडे वाटचाल होत असते व सर्व जीवन ऋतुचक्रानुसार चालू राहते तेव्हा जीवन म्हणजे संगीत आहे याचा प्रत्यय येतो. ही संकल्पना लक्षात आल्यास जीवनातल्या असंतुलनासाठी संगीताने उपचार करता येतात हे आपल्याला पटू शकते.

मन व संगीताचा संबंध भारतीय शास्त्राने शोधला. एका विशिष्ट तऱ्हेने स्वरांची योजना करून मनाची पकड कशी घेता येईल याचा विचार केला व यातून "राग' निर्माण झाले. मनाचा भाव वा मानसिकता बदलण्याचे काम राग करतात. त्यामुळे मनाचे रंग रागामुळे बदलतात. स्वरमालिकेची विशिष्ट पकड म्हणजे राग अशी आपण रागाची परिभाषा करू शकतो. त्यामुळे रागसंगीत वा रागावर आधारित संगीत ऐकल्यावर मनाचा रंग बदलतो यात काही नवल नाही. संगीताचा उपयोग नुसताच मनाचा रंग बदलणे वा मनाला दुःखातून आनंदाकडे नेणे एवढा मर्यादित नाही.

जीवनाचे कार्य नीट चालावे असे वाटत असेल तर संपूर्ण रोगनिवृत्ती व्हावीच लागेल व त्यासाठी रोग बरा करत असताना शरीरातील कुठल्या भागात रोग आहे, शरीराच्या कुठल्या भागाचे काम नीट होत नाही किंवा वात-पित्त-कफाचे असंतुलन कोठे झालेले आहे व ते दूर कसे करता येईल याचा विचार करावा लागतो. संगीत शरीरातील सर्व नाड्यांमधून प्रवाहित करून विशिष्ट अवयवापर्यंत पोचविण्याचे काम कवितेने म्हणजे शब्दांनी केले जाते. शब्द योग्य तऱ्हेने उच्चारण्यासाठी श्‍वासाचे गणित सांभाळणे व विशिष्ट आघात करून कंठातून योग्य नाद उत्पन्न होणे आवश्‍यक असते.

शरीरातील सर्व नाड्या (मेरिडिअन) विशिष्ट अवयवांना जोडलेल्या असतात. या सर्व नाड्या शब्दोच्चारामुळे छेडल्या जातात. उदा. ओठामधून जाणारी चेतनानाडी "प'वर्गाचे सर्व शब्द स्पंदित करते. या "प'वर्गाला पाच प्रकारे श्‍वासाचे चलनवलन जोडल्याने प-फ-ब-भ-म हा "प'वर्ग तयार होतो. ह्याचप्रमाणे सर्व स्वर व व्यंजनांची उत्पत्ती होते. या स्वर व व्यंजनांची विशिष्ट प्रकारे रचना करून त्याला रागसंगीतात बसवले तर शरीर, मन व आत्म्याचे आरोग्य संतुलित करता येते. म्हणजेच संगीत जीवनाला संतुलित करण्यासाठी उपयोगी पडते.

आरोग्य प्राप्त होईल या हेतूने मनुष्यमात्राला शरीराची, शरीराच्या संतुलनाची व असंतुलनाची माहिती करून देणे व एकूणच जीवन संगीतमय करणे असा "फॅमिली डॉक्‍टर' चा उद्देश आहे. आरोग्यशिक्षण सर्वांपर्यंत पोचावे या दृष्टीने "फॅमिली डॉक्‍टर'ने प्रयत्न केले. त्यात उपचारांच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून दिली. आयुर्वेद हा सर्वसमावेशक असल्याने आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य कसे मिळवता येईल यावर भर दिला. प्रत्येकाला आवश्‍यक असणारी औषधे व उपचार कधी मिळू शकतात तर कधी मिळू शकत नाहीत पण संगीताद्वारे केले जाणारे उपचार प्रत्येकाला सहजपणे व स्वस्तात उपलब्ध असतात, त्यासाठी खर्चही अत्यल्प येतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी सकाळी जात्यावर म्हणायच्या ओव्यांपासून ते रात्री झोपेपर्यंत संगीताचा भरपूर वापर केलेला दिसतो. संगीत हे कुणी अभंगात कुणी आर्येत, कुणी स्तोत्रात तर कुणी मंत्रात बसवले. वेदकाळापासून आद्य शंकराचार्यांपर्यंतच्या काळात पाहिल्यास असे लक्षात येते की बहुतेक सर्व संगीतरचना मनुष्यमात्राचे शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्य नीट करण्यासाठी तयार केल्या गेलेल्या होत्या. ह्या काव्यरचना वा मंत्ररचना कशा गाव्या? याचे शास्त्रही तयार केले गेले.

बहुतेकांना कल्पना असते की संगीतामुळे प्राणिमात्रांवर परिणाम होतो. गावात असलेले उंदीर बासरी वाजवून बाहेर नेल्याची कथा आपणा सर्वांना माहीत आहे. संगीतामुळे पाऊस पाडल्याच्या किंवा संगीतामुळे दगडाला पाझर फोडल्याच्या गोष्टीही आपल्याला माहीत असतात.

संगीताचा उपयोग पृथ्वीच्या पाठीवर सर्व मनुष्यमात्राने, लहानथोरांनी, सर्व धर्मांनी व सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवस्थांनी करून घेतलेला दिसतो. प्रार्थना ही जीवनाचा जणू पाया असल्यासारखी सर्व जगभर प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने संगीतप्रार्थनेने दिवसाची सुरुवात करावी, रात्री झोपताना प्रार्थना करावी, प्रार्थनेद्वारे देवाला आळवून देवाला प्रसन्न करून घ्यावे ही कल्पना मानवजातीत रुजलेली दिसते. हा देव दुसरा तिसरा कोणी नसून तो शरीर, मन व आत्म्याचे जेथे संतुलन असेल म्हणजेच जेथे प्रसन्नता असेल तेथे देव अवतरतो. आयुर्वेदानेही "प्रसन्नात्मेन्द्रियमनाः' असे म्हणून आरोग्यदेवतेची उपासना सांगितलेली आहे.

सध्याच्या संगीतात ताल असल्यासारखा वाटतो पण त्यात ताल नसतो, तसेच यात स्वर असतात पण राग नसतो. काळाबरोबर कितीही आधुनिकता आली तरी बेताल, बेसूर व कर्कश नाद जीवनाचे संतुलन करू शकत नाही.

संगीतामुळे रोगनिवारण पुनश्‍च आपल्या जीवनात यावे ह्या गोष्टीचा विचार करून "फॅमिली डॉक्‍टर'च्या ३००व्या अंकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी "आरोग्यसंगीता'च्या मैफिलीचे आयोजन करण्याचे ठरले. जे जे भावसंगीत, भक्‍तिसंगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, भजनसंगीत असे जे संगीत आज उपलब्ध आहे त्यातील काही रचनांचा उपयोग करून श्रोत्यांपर्यंत ही संकल्पना पोचविण्याच्या दृष्टीने "आरोग्यसंगीता'च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले.

"संगीताने जीवनसंतुलन' ही संकल्पना राबवत असताना संगीततज्ज्ञ, गायक व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्रितपणे यावर पुन्हा एकदा चिंतन, प्रयोग, संशोधन करणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारचे आरोग्यसंगीत समाजाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या मंडळींनी घेतल्यास खूप मोठे कार्य होईल. पूर्वीच्या काळी सकाळी घरोघरी गात जाणारा वासुदेव, प्रभातफेऱ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी व ठिकठिकाणी सकाळ-संध्याकाळ एकतारीवर भजने म्हणणारी मंडळी समाजाचे व वातावरणाचे संतुलन करत असत ही माहिती आपल्या सर्वांना आहेच.

"आरोग्यसंगीता'चा उपयोग केल्याने नुसते वैयक्‍तिकच नव्हे तर एकूण वातावरणाचे, सर्व सृष्टीचे व निसर्गाचे संतुलन होईल. म्हणजे आरोग्यसंगीमुळे नुसते रोगनिवारण न होता संपूर्ण विश्‍वात आरोग्यसंतुलनाचा अनुभव घेता येईल.

आजच्या "आरोग्यसंगीता'च्या कार्यक्रमातील संगीताद्वारे जीवन संतुलन करण्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचावे ही अपेक्षा !

डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment