Wednesday, July 8, 2009

स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतंय? काळजी करू नका...

सविता, वय वर्षे ४२, सध्या तिला सतत काहीतरी विचित्रच घडतंय असं वाटतंय, बोलताना शब्द आठवत नाहीत, ठरवलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, कधीकधी तर अगदीच "ब्लॅंक' झाल्यासारखं वाटतं, स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतंय. कशामुळे हे बदल होत आहेत?

वरील सर्व तक्रारी या ४२ ते ५४ या वयोगटातील स्त्रियांना कमी जास्त प्रमाणात जाणवत राहतात. यामागील कारण शोधण्यासाठी लॉस एंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. गेल ग्रीनडेल यांनी ४२ ते ५४ वयोगटांतील स्त्रियांची बुद्धिमत्ता चाचणी घेतली. या चाचणीत त्यांची बौद्धिक क्षमता, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीचे भान इ. विषयांची परीक्षा घेतली गेली.

त्यातून त्यांनी निष्कर्ष काढला, की ऋतुनिवृत्ती येण्याच्या काळात काही मर्यादित कालावधीसाठी आकलनक्षमता कमी होते. काही स्त्रियांमध्ये सुरवातीच्या काळात तर काहींमध्ये त्यादरम्यान हे बदल घडू लागतात. स्मृतिभ्रंशाचे प्रमाण प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळे आढळून आले; पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतुनिवृत्तीचा काळ संपल्यानंतर मात्र बौद्धिक क्षमता पूर्ववत झालेली आढळून आली. त्यामुळे या वयोगटातील स्त्रियांना आपल्याला स्मृतिभ्रंश होतोय की काय, असं वाटत असेल तर ते तत्कालीक आहे आणि काही दिवसांनी सर्व काही सुरळीत होईल असं समजण्यास हरकत नाही.

सौजन्य :ई-सकाळ

No comments:

Post a Comment