Sunday, June 28, 2009

आयुर्वेद:कान आणि आवाज

कानाचे काम ऐकणे व शरीराचा तोल राखण्यास मदत करणे आहे. म्हणूनच कानाशी निगडित विकारांमुळे श्रवणदोष उद्‌भवतो आणि कानफडात मारल्यावर माणसाचा तोल डळमळतो!

वैद्यकदृष्ट्या कानाचे तीन भाग पडतातः बहिर्कर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. बहिर्कर्णामध्ये कानाच्या पाळीचा व कानाच्या नळीचा समावेश होतो. कानाच्या पाळीचा उपयोग (हाताने धरून पिळण्याव्यतिरिक्त) बाहेरचा आवाज एकत्र करून तो नळीवाटे आत सोडण्यासाठी होतो. बहुतांशी प्राण्यांमध्ये कानाची पाळी हलवून हे ध्वनिग्रहण केले जाते. माणसांमध्ये मात्र स्वतःच्या इच्छेने कानाची पाळी सहसा हलवता येत नाही. कानाची नळी आधी मागे, मग वर अशी वळत जाते. त्यामुळे जोराच्या आवाजापासून तसेच वाऱ्यापासून कानाच्या पडद्याला संरक्षण मिळते. त्या कॅनॉलमध्ये हजारो वॅक्‍स-ग्लॅण्ड्‌स (मेण-ग्रंथी) असतात. त्या हवेतील धूलिकण पकडतात. वॅक्‍स हे वेळोवेळी पडून जात असते. घट्ट झालेला वॅक्‍स सैल करण्यासाठी कानामध्ये करंगळी घालून हलवावी. वॅक्‍स काढण्यासाठी काडेपेटीतील कापूस लावलेली काडी अथवा इअर बड वापरू नयेत. त्यांचा वापर फक्त कानाची पाळी स्वच्छ करण्यासाठी करावा.

कानाचे मुख्य कार्य हे मध्यकर्ण व बहिर्कर्ण करतात. हे दोन्ही भाग आपल्याला दिसत नाहीत. कारण ते कवटीच्या आत असतात. कानाचा पडदा बहिर्कर्ण व मध्यकर्ण यामध्ये ताणून बसवलेला असतो. पडद्याच्या आतील बाजूस हवेचा दाब कमी झाला तर बाहेरील हवेच्या दाबावामुळे पडदा आतल्या बाजूला फुगू शकतो. तसे झाल्यास तो फाटून त्याला भोक पडण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी मध्य कर्णाची पोकळी बंद-उघड होऊ शकणाऱ्या युस्टेशियन ट्यूबमार्फत घशाला जोडलेली असते. हवेचा समतोल बिघडला की आपण आपोआप आवंढा गिळतो. त्यामुळे युस्टेशियन ट्यूब उघडली जाते आणि घशातली हवा मध्यकर्णात जाते व हवेचा समतोल राखला जातो. विमानप्रवासात हवेच्या दाबामध्ये सतत होणाऱ्या चढउताराचा पडद्यावरील परिणाम टाळण्यासाठी आपल्याला चघळायला गोळ्या देतात. त्यामुळे ट्यूब उघडी राहते व कानाला दडे बसत नाहीत.

मध्यकर्णाच्या मोकळ्या जागेमध्ये तीन छोटीशी हाडे असतात. बोटाच्या चिमटीतही न पकडता येणाऱ्या या तीन नाजूक हाडांची नावे हातोडा, ऐरण आणि रिकीब अशी आहेत. ही तीन हाडे एकमेकांना जोडलेली असतात आणि पडद्यापासून आंतरकर्णापर्यंत ध्वनीची कंपने पोचवण्यासाठी ते "सेतू'चे काम करतात. या सेतूमुळे आवाजाचा अंतर्कर्णावर होणारा परिणाम दहापट मोठा होतो. म्हणूनच कर्णकटू आवाज कानावर पडताच या तीन छोट्या हाडांना जोडलेले स्नायू एकदम घट्ट होतात आणि तो आघात आंतर्कर्णाच्या नाजूक दरवाजावर आदळला जात नाही. पण असे आवाज सारखेच आदळत राहिले तर हे स्नायू कायमच आखडलेले राहतात व त्यांची व्यथा डोकेदुखीच्या रूपाने व्यक्त होते.

आंतर्कर्णामध्ये शंख किंवा गुंडाळलेल्या गोगलगायीच्या आकाराचा कॉक्‍लिआ ध्वनिलहरी ग्रहण करून त्यांच्या विश्‍लेषणाचे काम करून त्यांचे रूपांतर मेंदूकडे जाणाऱ्या चैतन्यलहरींमध्ये करतो. तसेच तीन अर्धवर्तुळाकार कॅनॉल आणि त्याला जोडलेले व्हेस्टिन्यूल यांचे कार्य शरीराच्या स्थिर व चल अवस्थेत तोल सांभाळणे हे असते. कॉक्‍लिआ सरळ केल्यावर त्याच्या एका बाजूला पडद्यावर आलेल्या ध्वनिलहरींची स्पंदने पोचवणारे रिकीबीचे हाड असते. या स्पंदनांमुळे कॉक्‍सिआमधील द्राव हलतो व त्याचा परिणाम होऊन आतील केशपेशी (हेअरसेल्स) हलतात. त्यांचे हलणे त्यांच्याच बुडाशी असणाऱ्या मज्जातंतूंमध्ये चैतन्य निर्माण करते आणि हाच करंट "ऑडिटरी नर्व्ह'मार्फत मेंदूचा आवाज ओळखून त्याचा अर्थ लावणाऱ्या भागाकडे पाठविला जातो.

आवाजाच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे आंतर्कर्णातील वेगवेगळ्या केशपेशी उत्तेजित होतात. आवाजाच्या "व्हॉल्यूम'प्रमाणेही त्यांचे प्रतिसाद बदलतात. विशिष्ट केशपेशींच्या हालचालींमुळे नेमक्‍या श्रुतींचे ग्रहण होते. ध्वनीच्या प्रत्येक गुणधर्माप्रमाणे केशपेशींचा प्रतिसाद बदलतो आणि त्यामुळेच आवाजाचे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्‍लेषण शक्‍य होते. ही विश्‍लेषणाची प्रक्रिया नैसर्गिक असली तरी त्याचे ग्रहण होण्यासाठी व ते स्मृतींच्या रूपात टिकून राहण्यासाठी एकचित्त होऊन दीर्घ काळ श्रवण करणे महत्त्वाचे असते. त्यामुळेच "कान तयार होऊन' कानसेन होता येते. काही थोड्या भाग्यवंतांना अत्यंत अल्पावधीतच हे "स्वरज्ञान' प्राप्त होते. संगीताची उपजत जाण असणे हे त्यामुळे बालवयातच दिसून येते.

ध्वनिप्रदूषणामुळे त्या त्या फ्रिक्‍वेन्सीचे हेअर-सेल्स मरून बहिरेपण येऊ लागते। जन्मतः कर्णबधिर असणाऱ्यांमध्ये कॉक्‍लिआपासून मेंदूकडे संदेश पोचवणारी यंत्रणा निकामी असते. सर्वसाधारणतः बधिरपणामुळे मूकत्व येते. यावरून आवाज निर्माण करण्यासाठी आवाज ऐकण्याचे महत्त्व लक्षात येते.

सौजान्य:ई-सकाळ

3 comments:

  1. janmtaha bahirepanavar konta upay aahe te sangave

    ReplyDelete
  2. 2 Varshapasun kanat dade basun aaikayala kami yet aahe plis upay sanga

    ReplyDelete
  3. Kanat dade basun aaikayla kami yet ahe ani kan khup dukhat ahe plis upay sanga

    ReplyDelete