Sunday, June 28, 2009

आयुर्वेद :काळजी मधुमेहाची

'मधू' म्हणजे मधुर किंवा गोड व 'मेह' म्हणजे बहूमूत्रता. म्हणजे ज्या व्यक्तीस वारंवार व मधुर अशी मूत्रप्रवृत्ती होते, त्यास मधुमेह असे म्हणतात. या विकारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त फिल्टर होऊन तयार होणाऱ्या मूत्रातही शर्करेचे प्रमाण आढळते व ते मधुर होते.

मधुमेह किंवा डायबेटिस हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्शुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते.

जर इन्शुलिन तयारच झाले नाही किंवा कमी प्रमाणात तयार झाले तर ग्लुकोज पेशीमध्ये जाऊच शकत नाही. परिणामी व्यक्तीस थकवा जाणवतो.

काही रुग्णांमध्ये अन्नाशयात इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशीच नष्ट होतात. त्यामुळे शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही व मधुमेह होतो, तर काही रुग्णांमध्ये इन्शुलिन तयार होते; परंतु शरीरातील पेशी त्याचा स्वीकार करण्यास तयार नसतात. त्यामुळे ग्लुकोज पेशीकडून वापरले न गेल्याने रक्तातील त्याचे प्रमाण वाढते व डायबेटिस होतो.

शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीतील विकृती, व्याधिशमत्व प्रणालीतील विकृती किंवा आनुवंशिक विकृतीमुळे डायबेटिस होतो.

1) अन्नाशय ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे. त्यात बिघाड झाल्यास डायबेटिस होतो.

2) विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे शरीरात अशी प्रतियोगी द्रव्ये (Antibodies) तयार होतात, की ही द्रव्ये व्याधी प्रतिकार करण्याऐवजी विशिष्ट पेशीच नष्ट करतात व डायबेटिसमध्ये या विषाणू हल्ल्यात अन्नाशयातील इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात.

3) आनुवंशिक विकृतीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्याचे वहन होते. हा एक बीजदोषच आहे.

मधुमेहाचे शरीरावर परिणाम

मधुमेहास Silent Killer असे म्हणतात. कारण यात रक्तातील साखर वाढणे एवढेच जरी व्याधीचे स्वरूप दिसत असले, तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ही रक्तातील वाढलेली शर्करेची पातळी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर खूप खोलवर परिणाम करते व तुमचा आरोग्याचा स्तर खालावतो.

वाढलेल्या साखरेचे परिणाम - 1) पचन संस्था, 2) रक्तवह संस्था, 3) त्वचा, 4) अस्थी, 5) श्‍वसन संस्था, 6) प्रजनन संस्था, 7) मूत्रवह संस्था, 8) व्याधिशमत्व प्रणाली या सर्वांवर होतो. म्हणूनच यात योग्य औषधे व पथ्य पाळणे खूप आवश्‍यक असते.

1) यात शरीरातील तसेच त्वचागत जलीय धातू कमी होऊन त्वचा शुष्क होणे, वारंवार तहान लागणे, कांती नष्ट होणे, भेगा पडणे, हे त्वचा विकार उत्पन्न होतात.

2) मधुमेहात रक्तसंवहनात येणारे अडथळे, नर्व्ह डॅमेज, स्थौल्य यामुळे संधिवाताचीही शक्‍यता वाढते.

3) वाढलेल्या शर्करेचे प्रमाण अधिक काळ रक्तात तसेच राहिले तर रक्त फिल्टर करणाऱ्या किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही व किडनी निकामी होते.

4) डायबेटिसमध्ये कर्बोदके, प्रथिने व चरबी यांच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यात तयार झालेली विषद्रव्य रक्तवाहिन्यांमध्ये संचय पावतात. परिणामी रक्तवाहिन्यांत अडथळा येतो व हृदयविकार किंवा रक्तदाबासारखे आजार ओढावतात.

5) मधुमेहामुळे डोळ्यांतील रेटायना या भागावर असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने अंधुक दिसणे, डोळे दुखणे, जड पडणे अशा दृष्टीशी व डोळ्यांशी निगडित तक्रारी असतात.

6) डायबेटिसमध्ये किडनीवर परिणाम झाल्याने रक्तातील विषद्रव्य बाहेर फेकली जात नाहीत. त्याचा परिणाम मेंदू व यकृतावर होतो, तसेच मेंदूच्या नसांमधील पेशी एकदा नष्ट झाल्या की पुन्हा तयार होत नाहीत व त्याचा पुरवठा असणारा भाग कायमचा विनाश पावतो व मधुमेही रुग्णात हा पेशीनाश लवकर होतो.

म्हणूनच मधुमेही रुग्णाने गाफील न राहता औषधे, व्यायाम, पथ्य, जेवणाच्या वेळा, पायी चालणे या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत.

मधुमेही रुग्णाचा आहार

या रुग्णांचा आहार हेदेखील एक औषधच आहे. मधुमेहींनी औषधाप्रमाणेच आहाराचेही काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

या रुग्णांचा आहार हा रुग्णाचे वजन, वय, त्याची शारीरिक हालचाल, मधुमेहाचा प्रकार, त्याच्या व्यवसायाचे स्वरूप यावरून ठरवावा.

रुग्णाने रोजच्या आहारात पाळावयाच्या गोष्टी -

1) आहारातील कर्बोदकाचे प्रमाण मर्यादित असावे.

2) रेषायुक्त (फायबर्स) पदार्थ आहारात असावेत.

3) बेकरीचे पदार्थ व फास्ट फूड्‌सचा आहारातील वापर टाळावा.

4) ताजी फळे व भाज्यांचा आहारात वापर असावा.

5) झोपण्यापूर्वी अडीच ते तीन तास आधी जेवण घ्यावे.

6) दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा 3-4 तासांनी थोडाथोडा आहार घ्यावा.

7) आहार हा कमी कॅलरीज असणारा, परंतु परिपूर्ण पोषकांश असणार असावा.

8) प्रत्येक मधुमेही व्यक्तीस एकच आहार नसतो. तसेच तोच तोच आहार खूप दिवस चालू ठेवणेही अपायकारकच. म्हणून आहारात वैविध्य असावे.

9) शक्‍यतो कृत्रिम साखर वापरणे टाळावे.

मधुमेहाचे रिस्क फॅक्‍टर्स व त्याची लक्षणे

रिस्क फॅक्‍टर्स

1) स्थूलता - आवश्‍यक वजनापेक्षा जास्त वजन असल्यास मधुमेहाची शक्‍यता 20% जास्त असते. आवश्‍यक वजनापेक्षा जेवढे जास्त वजन असेल तेवढी मधुमेहाची शक्‍यता वाढत जाते.

2) वय 40 वर्षांनंतर मधुमेहाचा धोका वाढत जातो. चाळिशीनंतर वजन कमी असो किंवा जास्त असो, मधुमेह होण्याचा धोका जास्तच असतो.

3) अन्नाशयास वारंवार येणारी सूज इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींवर परिणाम करते व मधुमेहाची शक्‍यता अशा रुग्णांमध्ये वाढते.

4) काही औषधांच्या अधिक सेवनानेही मधुमेह होऊ शकतो. उदा. स्टिरॉईड्‌स. म्हणूनच वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधी उपाययोजना करू नये.

5) गरोदरपणा ः यात मधुमेहाची शक्‍यता असते. परंतु हा मधुमेह तात्पुरता असतो व प्रसूतीनंतर तो बरा होतो.

मधुमेह लक्षणे

1) वारंवार व भरपूर प्रमाणात होणारी मूत्रप्रवृत्ती

2) खूप तहान लागणे, घसा कोरडा पडणे, नाक शुष्क होणे

3) वजन अचानक घटणे किंवा वाढणे

4) सतत थकवा जाणवणे, आळस वाटणे, कामात उत्साह न जाणवणे

5) मळमळ होणे, उलटी, अपचन यांसारखी लक्षणे

6) वारंवार त्वचेचे, मूत्रवह संस्थेचे किंवा स्त्रियांना योनीमार्गाचे विकार होणे

7) स्त्रियांमध्ये श्‍वेतप्रदर, योनीमार्गात कंड अशा तक्रारी.

8) प्रथिने व कर्बोदकाच्या पचनावर परिणाम

9) अंधूक दिसणे, डोळे दुखणे

10) पाय दुखणे, पोटऱ्या ओढणे

वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा आपण रिस्क फॅक्‍टरमधील कोणत्या फॅक्‍टरमध्ये असू तर सर्वप्रथम रक्तातील शर्करचे प्रमाण तपासून बघावे.

मधुमेह चिकित्सा

आयुर्वेदानुसार याची चिकित्सा 2 प्रकारे करतात. 1) शमन, 2) शोधन चिकित्सा

शमन चिकित्सा - शमन चिकित्सा म्हणजेच औषधी चिकित्सा. यात निरनिराळ्या काष्ठौषधी, रसौषधींचा उपयोग करतात. गुडूची, आवळा, हरिद्रा, त्रिफळा, मुस्ता, मेथ्या तसेच गुग्गुळ कल्प व व्याधीचे बलाबल बघून वसंत कल्प या अशा अनेक कल्पांची उपाययोजना करतात.

शोधन चिकित्सा - शोधन म्हणजे शरीराची शुद्धी. मधुमेही रुग्णात वमन व बस्तीसारख्या शोधन चिकित्सेने शरीराचे उत्तम शोधन होते व व्याधी आटोक्‍यात राहण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार प्रमेह हा कफदोषाचा व्याधी सांगितला आहे. त्याची व्याख्या करतानाच "बहुद्रव श्‍लेष्मा' अशी केलेली आहे व कफावर आयुर्वेदात वमन चिकित्सा देतात, तसेच बस्ती चिकित्सेनेही धातूंची शुद्धता होते. त्यातील क्‍लेद नाहीसा होतो. धातूंचे शोधन होते व त्यांचे उत्तम संहनन होते.

म्हणूनच वमन व बस्ती ही चिकित्सा वर्षातून एकदा तरी किंवा व्याधीचे बलाबल बघून करावी.

आजकालच्या प्रचलित औषधाने रक्तातील "शुगर लेव्हल' नियंत्रित राहते; परंतु वजन घटणे, पाय, पोटऱ्या दुखणे, थकवा जाणवणे, पचनातील बिघाड, अंधुक दिसणे या तक्रारी तशाच राहतात.

परंतु आयुर्वेद चिकित्सेने रक्तातील शर्करेचे प्रमाण केवळ नियंत्रित ठेवणे एवढाच उद्देश नसून शरीरात इन्शुलिनचा पेशींचा स्वीकार वाढविणे तसेच अनियंत्रित शर्करेचा जो परिणाम डोळे, त्वचा पचन संस्था, इत्यादी अनेक संस्थांवर झाला आहे, त्याचाही परिणाम हळूहळू नाहीसा करून उत्तम आरोग्याचा दर्जा ठेवणे हे आयुर्वेद चिकित्सेचे मुख्य ध्येय आहे. यात केवळ लाक्षणिक चिकित्सा न देता शरीराचे शोधन करून शरीरातील विषद्रव्य बाहेर काढतात व त्यामुळेच केवळ रक्तातील साखरेचे प्रमाणच नियंत्रित राहते असे नसून, अशा रुग्णांना जाणवणारा थकवा, पाय दुखणे, वजन घटणे, तहान लागणे या तक्रारीही नाहीशा होतात.

आयुर्वेदिक औषधे व्यवस्थित व नीट पथ्य पाळून घेतली तर काही रुग्णांचे इन्शुलिन इंजेक्‍शन बंद होते

सौजन्य:ई-सकाळ

No comments:

Post a Comment